Monday, 23 December 2013

Book Review - World War Z


वर्ल्ड वॉर झी
लेखक - मॅक्स ब्रूक्स
प्रकाशक – डकवर्थ ओव्हरलूक
४३२ पाने
रु. २९९

- विवेक गोविलकर

लोकप्रिय पुस्तक हे उथळच असायला हवे किंवा अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून लिहिलेले पुस्तक हे रटाळ आणि वाचायला कठीण असले पाहिजे या समजाला मॅक्स ब्रूक्स यांचे ‘वर्ल्ड वॉर झी’ हे पुस्तक छेद देते. लोकप्रियतेचे उच्च्चांक गाठणाऱ्या या पुस्तकात विज्ञान, युद्ध-शास्त्र, समाज-शास्त्र, मानस-शास्त्र, जागतिक राजकारण आणि अर्थकारण या सगळ्यांना आपल्या अचाट कल्पनाशक्तीची जोड देऊन लेखक विदारक असे सामाजिक भाष्यही करतो. सरकारी नाकर्तेपणा, खाजगी क्षेत्रातला भ्रष्टाचार, सर्वसाधारण माणसांमधला दूरदृष्टीचा अभाव, नोकरशाही या सर्वांवर येथे कथानकाच्या अनुशंगाने सूचक टीका केलेली आढळते.

खऱ्या अर्थाने जागतिक युद्ध म्हणता येईल अशा प्रकारची ही कथा आहे. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो. अमेरिकेसकट जगातली कुठलीच राष्ट्रे या संकटाचा मुकाबला करायला सज्ज नसतात. त्या संकटाचे स्वरूप आणि त्यावरचा इलाज याबाबतचे पूर्ण अज्ञान तर असतेच. पण त्याच्या जोडीला आपल्याकडे काही उपाय असल्याचा खोटा पण उर्मट आत्मविश्वास तथाकथित प्रगत राष्ट्रांकडे असल्यामुळे संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते.

असे कोणते संकट इतक्या विध्वंसक स्वरूपात जगासमोर आलेले असते? एका महाभयानक विषाणूच्या संसर्गामुळे माणसांचे झाँबीमध्ये रुपांतर होते. झाँबी म्हणजे चालणारे प्रेत. ते जिवंत माणसांवर हल्ला करते, त्यांना चावते. त्या संसर्गामुळे त्या माणसांचेही रुपांतर झाँबीमध्ये होते. झाँबीला भावना, बुद्धी, वेदना यापैकी काहीही नसते. त्यामुळे माणसांसाठी संहारक ठरणारी बॉंब किंवा रासायनिक शस्त्रास्त्रे झाँबीविरुद्ध कुचकामी ठरतात. त्याचा मेंदू एखाद्या शस्त्राने नष्ट करणे किंवा त्या प्रेताला सडून नष्ट होऊ देणे एवढेच मार्ग इतर जिवंत माणसांपुढे असतात.

चीनमध्ये नोंदवलेल्या पहिल्या प्रादुर्भावानंतर अल्प काळात ही महामारी जगभर पसरते. मानवी अवयवांचा बेकायदेशीर व्यापार आणि जगभराचे प्रवासी या प्रसाराला कारणीभूत ठरतात. अब्जावधी लोक प्रत्यक्ष संसर्गामुळे किंवा इतर हालअपेष्टांमुळे मृत्युमुखी पडतात. या साथीला घाबरून स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे संपूर्ण देशाच्या देश ओस पडतात. या संकटाला जगातले वेगवेगळ्या देशांचे आणि संस्कृतींचे लोक कसे सामोरे जातात याची थरारक आणि उत्कंठावर्धक कहाणी म्हणजे वर्ल्ड वॉर झी.  वर वर पाहता कोणाला ही एखाद्या गल्लाभरू चित्रपटाला साजेशी साचेबद्ध भयकथा वाटू शकेल. झाँबी या संकल्पनेचा वापर केलेल्या अनेक कथा आणि चित्रपट आतापर्यंत आलेले आहेत. पण या पुस्तकाचा केंद्रबिंदू मानवजात आणि झाँबी यांच्यातले जागतिक स्तरावरचे युद्ध हा आहे. त्याबरोबर जगभरातल्या विविध संस्कुतींचा तुलनात्मक अभ्यासही येथे आहे. शिवाय एकदा झाँबी ही संकल्पना वाचकांनी स्वीकारल्यानंतर त्याचे सर्व तर्कसुसंगत परिणाम आणि घडणाऱ्या घटनांचे मनाला पटेल असे स्पष्टीकरण याकडे लेखक विशेष लक्ष देतो. या कथेत झाँबीऐवजी दुसरे कुठले तितकेच मोठे संकट आले असते तरीही नोकरशाही, सैन्य, राजकारणी, सर्वसामान्य लोक कसे वागतील याबद्दलचे लेखकाचे निरिक्षण लागू पडले असते.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे युद्धाच्या समाप्तीनंतर एक आयोग नेमला जातो. या आयोगाचा एक अधिकारी युद्धातून वाचलेल्या जगभरातल्या असंख्य माणसांच्या मुलाखती घेतो. या मुलाखतीमधून या महायुद्धाच्या कथा उलगडतात. निवेदकाने किंवा एखाद्या प्रमुख पात्राने संपूर्ण कथन करण्यापेक्षा ही तुकड्या तुकड्यातून जोडणी करण्याची पद्धत जास्त प्रभावी ठरते. याचे कारण म्हणजे या युद्धाच्या कथा कृत्रिमपणे ‘रम्य’ लेलेल्या नाहीत. उलट कधी त्या भयानक तर कधी ओंगळ, पण नेहमीच कोणाच्या तरी प्रत्यक्ष अनुभवांतून आल्याप्रमाणे अस्सल स्वरूपात मांडलेल्या आहेत.

या विषाणूवर काही उपाय किंवा लस नसल्यामुळे सुरवातीला सर्वच देशांमध्ये या साथीबद्दल बोलायची कोणाचीही तयारी नसते. पण या गोष्टी कायमच्या लपवून ठेवणे शक्यच नसते. रशियामध्ये काही ठिकाणी सैनिक या विरोधात बंड करतात. बंडखोर सैनिकांना कोर्ट मार्शल करून शिक्षा देण्यापेक्षा एक अघोरी मार्ग त्यांचे वरिष्ठ अधिकारी निवडतात. “तुम्हा लाडावलेल्या पोरांना लोकशाही हा देवाने बहाल केलेला अधिकार वाटतो. आता ही लोकशाही अमालात आणायची संधी तुम्हाला मिळणार आहे.” असे सांगून सर्व सैनिकांचे दहा-दहा जणांचे गट केले जातात. प्रत्येक गटाला, आपल्यापैकी कोणा एकाला ठार करायचे याचा निर्णय ‘लोकशाही पद्धतीने’ घ्यावा आणि अमलात आणावा असे सांगितले जाते.

त्या दिवसापासून सर्व रशियन सैनिक भीती आणि अपराधी भावना अशा दुहेरी धाग्याने एकत्र बांधले जातात. ते आपले ‘निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य’ खुशीने सोडून देतात. दुसऱ्या कोणाकडे, विशेषतः वरिष्ठांकडे बोट दाखवून, “त्यांनी तसं करायला सांगितलं म्हणून .... आमची काही चूक नाही.” हे म्हणण्याचे ‘स्वातंत्र्य’ त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचे ठरते. सैनिकांच्या प्रशिक्षणात मानसशास्त्राचा कसा वापर होतो याची इतरही उदाहरणे पुस्तकात इतरत्र आढळतात.

कल्पित हे वास्तवाच्या किती जवळ येउ शकते हे दक्षिण आफ्रिकेच्या संदर्भात दिसून येते. जेव्हा सरकारी धोरण काळे, गोरे आणि गहूवर्णी लोक, यांना वेगळे ठेवण्याचे होते, तेव्हा या वर्णभेदी भूमिकेच्या विरोधात कधीही स्फोट होऊ शकेल याची जाणीव गोऱ्या लोकांना होती. अशा आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांच्यातल्या एकाने एक योजना बनवलेली असते. सगळ्यांना वाचवणे शक्य नाही, तेव्हा काही निवडक लोकांना वाचवायचे आणि गरज पडल्यास इतर लोकांचा बळी द्यायचा असे या योजनेचे स्वरूप असते. झाँबीचे संकट आल्यावर, बासनात बांधून ठेवलेल्या या योजनेची आठवण काही देशांना होते. कादंबरीतली ही योजना जरी काल्पनिक असली तरी १९८० च्या दशकात अशा प्रकारची योजना प्रत्यक्षात कोणीतरी बनवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शून्य अंशाखालच्या तापमानाला झाँबी गोठून जातात. त्यामुळे जगभर उत्तरेकडच्या कडाक्याच्या थंडीचा लोकांना आसरा वाटायला लागतो. तेव्हा लोक अमेरिकेतून कॅनडाकडे किंवा भारत आणि चीनकडून रशियाकडे, मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हायचा प्रयत्न करतात. त्यामुळे झाँबीचे संकट थोडे कमी झाल्यासारखे वाटले तरी इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांना जंगलातच राहावे लागते. पेट्रोल आणि डीजेलच्या अभावी सर्वसामान्यांसाठी दळणवळणाची कोणतीच साधने शिल्लक रहात नाहीत. वीज, फोन, दुकाने या सर्वांविना लोकांना केवळ जगावे कसे हे शिकून घ्यावे लागते. आपापल्या वस्तीपूरती, श्रमांवर आधारित जीवनशैली हाच मार्ग लोकांपुढे रहातो.

या सर्व प्रकारात सर्वसामान्यांचे आत्यंतिक शारीरिक आणि मानसिक हाल होतात. त्यातूनच स्टॉकहोम सिंड्रोमचे एक वेगळेच स्वरूप या ठिकाणी आढळून येते. झाँबी संकटाला तोंड देताना होणाऱ्या मानसिक यातनांचा परिणाम म्हणून काही जिवंत लोक झाँबीसारखेच वागायला लागतात. याच्या अगदी उलट अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका प्रसंगात एकट्या पडलेल्या एका सैनिकाची झालेली दिसते. हजारो झाँबी आसपास असताना मदतीला मात्र कोणी नाही. इतर कोणाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही. अशा वेळी ती सैनिक स्त्री केवळ जिवंत रहाण्याच्या आत्यंतिक प्रेरणेमुळे आपल्या कल्पनेतून एक पात्र निर्माण करते. सॅटलाईट फोनवरून त्या पात्राकडून तिला महत्वाच्या सुचना मिळतात असे तिला वाटते. प्रत्यक्षात मात्र सैनिकी प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीचा वापर करून ती जखमी अवस्थेत कित्येक मैलांचा टप्पा पायी पार करून सुरक्षित ठिकाणी जाते.

वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांच्या वैशिष्ट्याप्रमाणे त्या त्या देशातल्या युद्धाचे स्वरूप बदलते.   भारतातल्या लोकांना गंगा मातेचा आधार वाटतो. म्हणून लाखो लोक वाराणासीला गर्दी करतात. परिणामतः सगळेच्या सगळे झाँबीच्या साथीला बळी पडतात. जपानमधल्या काही तरुणांचा संगणकामुळे वास्तवातल्या जगाशी आधीच संपर्क तुटलेला असतो. त्यांचा भर विचार करण्यापेक्षा  घोकंपट्टी असतो. त्यांचे जीवन इतके यंत्रवत झालेले असते की भूक, लैंगिक भावना वगैरे गोष्टी त्यांच्या उद्दिष्टांपासून विचलित करणाऱ्या आहेत असे त्यांना वाटते. संपूर्ण देश खाली करून लोकांना दुसरीकडे न्यायला सुरवात होते, तेव्हा अशाच एका तरुणाला ही स्थलांतराची प्रक्रिया आणि त्यासासंबंधीची आकडेवारी समजून घेण्यात जास्त रस असतो.

आईसलंडला कधी सैन्याची गरज वाटली नाही. त्यामुळे लाखो निर्वासित आईसलंडला जातात तेव्हा त्यांना अडवायला कोणीच नसते. त्यातल्या अनेकांना आधीच संसर्ग झालेला असतो. परिणामतः अल्पावधीत तिथे झाँबींचा सगळ्यात जास्त सूळसुळाट झालेला दिसतो. क्युबाचे सरकार मात्र हीच गोष्ट टाळते आणि परिस्थितीचा फायदा उठवून झाँबी-युद्धाच्या समाप्ती नंतरच्या बदलेल्या परिस्थितीत जागतिक महासत्ता होण्यात यशस्वी होते. पॅरिसच्या भुयारी रेलवे मार्गात लाखो लोक आसरा घेतात आणि सर्वच्या सर्व साथीला बळी पडून झाँबी बनतात.

मानवी आयुष्याला किंमत न देणाऱ्या चिनी सरकारने अनेक दशके आपल्या अफाट लोकसंख्येचा शस्त्रासारखा वापर केला होता. त्यांच्या तथाकथित संरक्षक मानवी भिंती झाँबींपुढे मात्र निष्प्रभ ठरतात. कारण प्रत्येक मृत सैनिक झाँबी बनून त्यांच्यावर उलटतो. त्यांच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबूडीवरचे सैनिक सरकारपासून फुटून निघतात. आणि नंतर जुलमी राज्यकर्त्यांबरोबर झालेल्या चकमकीत विजयी होऊन चिनी लोकशाहीचा मार्ग मोकळा करतात.

युद्ध टाळावे असे मानणाऱ्या लोकांना वाटते की काही वर्ष कळ सोसली तर झाँबी आपल्याआपण सडून नाहीसे होतील. पण अमेरिकेचे अध्यक्ष ठासून सांगतात की झाँबींनी आपली भूमी बळकावणे आणि प्रियजनांची हत्या यापलीकडे जाऊन मानवी आत्म्यावर हल्ला केलेला आहे. त्यामुळे या पृथ्वीवर पुन्हा मानवाचे अधिराज्य स्थापन करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे हे त्यांचे ध्येय बनते.

झाँबींबरोबरच्या युद्धात वाटाघाटी, तह वगैरे गोष्टींना स्थान नसते. त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाचा पूर्ण नाश होईपर्यंत हे युद्ध चालूच रहाणार हे उघड असते. विषाणुचा संसर्ग झालेले सैनिक झाँबी बनून उलटण्याच्या आधीच त्यांना मारून टाकावे या हुकुमाची अंमलबजावणी करणारे अधिकारी मोठ्या संख्येने आत्महत्या करतात. पण संसर्ग आलेल्या सैनिकांना आत्महत्या करू देणे हे पाप आहे असेही अनेकांना वाटते. त्यामुळे संसर्ग झालेल्या सैनिकांचे धर्मगुरुंमार्फत ‘शुद्धीकरण’ या नावाखाली शेकडो लोकांची कत्तल उडवली जाते.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हे युद्ध हळू हळू आटोक्यात येते. या युद्धानंतर विजयोत्सव साजरा करायचे त्राणही उरलेल्या लोकांमध्ये नसते. युद्धानंतरचे जग मात्र पूर्णपणे बदलून जाते. क्युबाचा महासत्ता म्हणून उदय, इराण आणि पाकिस्तान यांनी एकमेकांचा अणु बॉंब टाकून केलेला विध्वंस, क्युबा आणि चीन मधली नव्याने आलेली लोकशाही, रशियामध्ये झाँबीचे संकट आणि एचआयव्ही यातून वाचलेल्या फार थोड्या स्त्रीयांचा मुलांना जन्म देण्यासाठी करून घेतलेला वापर या काही युद्धोत्तर जगातल्या महत्त्वाच्या गोष्टी. युद्धाच्या सुरवातीच्या काळात बनावट लस बनवून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि कोट्यावधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या कंपन्या, युद्धानंतर स्थावर मालमत्ता बळकावणारे आणि अन्नधान्याची बाजारपेठ मुक्त असावी याचा आग्रह धरणारे धनिक, हतबल सरकार या सर्वाचे चित्रण इतके प्रभावी आहे की या कल्पनेतल्या गोष्टी वास्तवात आल्या तर काय या विचारात वाचक पूर्णपणे ओढला जातो. झाँबी ही केवळ एक संकल्पना. पण बाकी सर्व मात्र वास्तवाला भिडणारे. लेखकाचे यश यातच आहे.