Sunday, 1 July 2012

Obituary - Grace

ग्रेस 

-    विवेक गोविलकर 


ग्रेस गेल्याची बातमी इंटरनेट वर वाचली. ग्रेसची कर्करोगाशी झुंज बराच का चालली होती. त्यामुळे या बातमीमुळे धक्का बसला वगैरे म्हणणे हे उगाचच एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या प्रतिक्रीयेसारखे वाटते. तरीही कुठेतरी आयुष्यात काहीतरी फार मोठे गमावल्याची भावना रहातेच

ग्रेसने आमच्या पिढीला खूपच त्रास दिला. एखादी कविता समजताही आवडावी हा प्रकार ग्रेसच्याच बाबतीत होऊ शकला. किंवा एखादी कविता समजली असे वाटले तरीही ती दुसऱ्या कोणाला समजावून सांगणे हे अशक्यच होते.  हा कवितेचा अनुभव हा ज्याचा त्यानेच घ्यायचा. कुसुमाग्रजांच्या कवितांना एखाद्या समूहाला साद घालण्याची ताकद होती. ग्रेसची मोहिनी सुद्धा एका मोठ्या समूहावर होती. पण या समुहात ग्रेसची कविता प्रत्येक मनात स्वतंत्रपणे नांदत होती

जीएंच्या कथांवर आम्ही खुप चर्चा आणि वाद केले. या वादांमधून आम्हाला जीए जास्त समजत  गेले.  पण ग्रेसच्या कवितांच्या बाबतीत अशा प्रकारची चर्चा होणे कठीण होते. ग्रेसची अमुक कविता आवडली किंवा तमुक कविता ग्रेट आहे एवढ्यावर ही चर्चा थांबायची



कवीच्या किंवा चित्रकाराच्या मनातला अर्थ  आणि रसिकांना जाणवलेला अर्थ हा एक नसण्याची शक्यता ही असतेच. ग्रेसच्या बाबतीत तर नक्कीच. अनेकदा आपल्याला अर्थ समजलेली किवा  थोडाफार अर्थ समजलाय असे भासणारी चित्रे भेसूर, कुरूप किंवा बीभत्स असतात. ग्रेसच्या कविता मात्र महलमधल्या मधुबालासारख्या सुंदरच होत्या. हे सौंदर्य फक्त शब्दांचे नव्हते. ते जाणिवा आणि भावनांच्या प्रकटीकरणाचेही  होते. मानवी दुःख आणि वेदनांचा इतका सुंदर आविष्कार क्वचितच इतर कोणी केला असेल

ग्रेसच्या काही कवितांना चाली लावल्या गेल्या. 'पाउस कधीचा पडतो' किंवा 'ती गेली तेव्हा' ही त्याची ठळक उदाहरणे. हे प्रयत्न इतके धाडसाचे होते की रसिकांनी या धाडसालाच भरभरून दाद दिली. काही प्रतिभावान संगीतकारांनी आपल्या परीने त्या कवितांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्या चालींमधून रसिकांना सुद्धा आपल्याला अधिक काहीतरी मिळाल्याचा आनंद झाला. पण तरीही हा अर्थ आणि हे स्पष्टीकरण अंतिम असे मानायची सोय नाही. दुसरे म्हणजे या कवितांची लोकप्रिय गाणी होता त्या केवळ ग्रेसच्या कविताच राहिल्या

कलावंताने आपल्या कलाकृतीविषयी बोलू नये असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे ती कलाकृती समजायला मदत होते की नाही हा वादाचा मुद्दा आहे. एखाद्या मित्राला आपल्याला भावलेल्या कवितेविषयी भरभरून बोलताना ऐकणे हा एक खास अनुभव आहे. एखाद्या पट्टीच्या शिक्षकाकडून वाढत्या वयाच्या आणि जाणीवांच्या काळात एखाद्या कलाकृतीचा आस्वाद  घ्यायला शिकणे हे एक भाग्य आहे

पण एखादा कवी स्वतःच आपली शब्दरचना कशी चपखल आहे किंवा त्या शब्दांमागची कल्पना किती तरल आहे याचे स्पष्टीकरण देतो तेव्हा त्या मूळ काव्याचे सौंदर्य कुठेतरी हरवून जाते असे मला वाटते. एवढेच कशाला, कवीचा भावनिक प्रवास आणि त्यातून निर्माण होणारी कलाकृती यांच्यातल्या संबंधांचा अभ्यास हा कलाकृतीच्या आस्वादाला  पूरक ठरेलच याची खात्री देता येत नाही. एकच घटना पाहणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतील. त्यामुळे ज्या घटनेमुळे एखादी कविता जन्माला येते त्या घटनेपेक्षा कवीची कल्पना हीच गोष्ट कवितेच्या दृष्टीने महत्वाची ठरते

आणि मग एके दिवशी 'संध्यासूक्तांचा यात्रिक' ही व्हिडिओ सीडी हातात पडलीया सीडीमध्ये 'आदिमातेचा शोध' याविषयी ग्रेसचे मोठे भाष्य आहे. आणि इथेच सगळी गडबड होते. जी कविता आपल्याला बऱ्यापैकी समजली त्या आई विषयक कवितेचा ग्रेसने सांगितलेला अर्थ वेगळाच निघतो

'ती गेली तेव्हा' ही एक गाजलेली कविता. माझ्या एका मित्राच्या मते ही एक त्रासदायक कविता. तो अनेक वेळा अनौपाचारक मैफिलींमध्ये ही कविता म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा. ग्रेसच्या सर्व कवितांमध्ये त्यातल्या त्यात समजलेल्या कवितांमधली ही एक असे मानायला हरकत नाहीआईचा मृत्यू किंवा कायमच्या वियोग हा या कवितेचा गाभा आहे असा अनेक रसिकांचा समज होता हे स्वतः ग्रेसने सांगितलेले आहे. कोणत्याही प्राध्यापकाच्या किंवा समिक्षकाच्या मदतीशिवाय ही कविता रसिकांना अगदी भिडली

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता 
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता 

तशी सांजही अमुच्या दारी येवून थबकली होती 
शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता 

ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो 
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता 

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
दारावर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता 

हे रक्त वाढतांनाही मज आता गहिवर नाही 
वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता 

यातले घनव्याकूळ रडणे आणि बालपण संपणे या दोन उल्लेखांमुळे आम्ही आईचा मृत्यू हा सरळ अर्थ लावला. आणि बालपण संपण्याची पुढची पायरी म्हणजे 'आता गहिवर नाही' असे मानून चाललो

ग्रेसच्या स्पष्टीकरणानुसार हा आईचा वियोग तात्पुरता आहे. त्याची मनस्विनी आणि देहस्विनी आई तिच्या दूर जाण्याचे कारण आपल्या लहान मुलाला सांगू शकत नाही. ती आपल्या मनस्वी, देहस्वी कळांचे बालसुलभ स्पष्टीकरण देवू शकत नाहीम्हणून त्या मुलाला वाटते की आपली आई आपल्याला कायमची सोडून गेलेली आहे. आपले बालपण संपले हा त्याला झालेला फक्त एक भास आहे. कवीच म्हणतो की 'अंगणात गमले मजला', म्हणजे बालपण संपणे हा फक्त भास आणि त्या  खरे काही नाही. ग्रेसच्या मते स्त्रीचे आईपण आणि मादीपण वेगळे करता येत नाही. स्तनपानामधली वात्सल्यभावना ही केवळ शरीरशास्त्रीय आहे. त्यामध्ये  उद्दात्त किंवा मंगल असे काही नाही

प्रत्यक्ष  ग्रेसच्या शब्दांत सांगायचे झाले तर, "बाईचा आणि मादीचा उल्लेख केल्यानंतर स्त्री पुरुष  भावाचे वैषयिक, दैहिक, प्रेमापासून तर आत्मिक प्रेमापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हणावसं वाटतं की तिच्या माझ्यामध्ये वात्सल्य भाव आहे पण त्या वात्सल्यभावाच्या राखेच्या ढिगाऱ्याच्याखाली स्त्री, मादी आणि नर यांच्या आदिम आकर्षणाचे तंतू आहेतया तंतुंमध्ये तिच्या आणि माझ्यातला वात्सल्य भाव कुठे डागळतो, कुठे उजळतो, कुठे पळून जातो.” एवढे सांगून ग्रेस शेवटी आई आणि मुलाचे नाते हे स्त्री आणि पुरुषाचेच आहे हे नमूद करतो

आईचे हे जाणे हे अगदी तात्पुरते आहे हे ग्रेस पुन्हा पुन्हा सांगतो आणि आईचा कायमचा वियोग हा रसिकांचा भ्रम आहे हेही ठासून सांगतोएवढेच  नाही तर ती परत आलेली आहे याचा कवितेमधला  पुरावा म्हणून 'मज आता गहिवर नाही' या ओळींचा दाखला देतो

समजल्यासारख्या वाटलेल्या कवितेतल्या शेवटच्या ओळी मात्र खास ग्रेस पद्धतीने गोंधळात टाकणाऱ्या होत्या. द्रौपदीच्या वस्त्रातल्या नागड्या कृष्णाचा उल्लेख हा आधीच्या ओळींपासून काहीसा फटकून होता. पण ग्रेस त्यावर एक वेगळेच स्पष्टीकरण देतो. त्याच्या मते  कृष्ण आणि द्रौपदी म्हणजे एक पूर्ण पुरुष आणि एक मादी यांच्यातला नव्या अनुबंधाचे नाते याठिकाणी प्रस्थापित होतेएकदा हा अर्थ लावला की आधीची सर्व कविता पुन्हा नव्याने समजावून घ्यायला लागते. आणि मग ग्रेसला अभिप्रेत असणारा स्त्री पुरुष संबंध हा आई-मुलगा किंवा भाऊ-बहिण असे कितीही वेश घेऊन आला तरी शेवटी नर-मादी अशा शरीर-शास्त्रीय पातळीवर जाऊन पोहोचतो

या ठिकाणी एक मुलभूत प्रश्न निर्माण होतो. कलावंताने कलाकृती निर्माण केल्यावर त्याचा तिच्यावरचा हक्क रसिकांकडे हस्तांतरित होतो, निदान व्हावा. मग कवितेचा अंतिम अर्थ कवीने गृहीत धरलेला की रसिकांनी लावलेला हा प्रश्न निर्माण होतो. ग्रेसची सीडी पाहून एका अतिशय आवडलेल्या कवितेचा एक वेगळाच अर्थ सापडतो. पण हा अर्थ रसिकांना जाणवलेल्या अर्थापेक्षा अधिक सुंदर आहे असे म्हणता येईल का? ग्रेसचा अर्थ हा एका अत्यंत प्रगल्भ आणि चिंतनशील मनाचा आविष्कार  आहे आणि लोकांनी  लावलेला अर्थ म्हणजे एका कोवळ्या आणि निरागस मुलाची भावना आहे

लोकांना कविता आवडते ती अशा भावनांमुळे, शरीरशास्त्रीय स्पष्टीकारणांमुळे नाही. आम्हाला कवितेत बघायची आहे ती महल मधली सुरवातीची परलोकातली वाटणारी मधुबाला. सिनेमाच्या शेवटी दिसणारी माळ्याची मुलगी नाही. आम्हाला कपाटाच्या आतल्या दारावर लावायचा आहे तिचा फोटो, x - ray नाही

शेवटी आपल्याला भावलेली कविता आपल्या सोबतीला असावी. इतरांच्या अगदी कविच्याही अर्थाचे ओझे आपण कशाला वाहावेपण आता या गूढ सौंदर्याचा निर्माता आपल्यात नाही. तरीही हरकत नाही. संध्याकाळच्या कवितांची संध्याकाळ अजून झालेली नाही. चंद्रमाधवीचे प्रदेश अजून नव्याने खुणावतात. ग्रेसच्या कवितांची सोबत तर कायमचीच. त्यानेच सांगून ठेवले आहे

नको रडू बाई अशी | जीव पोळल्यासारखी |
मृत्यू दुःखाचा पारखी | एकमेव ||

मुंबई 
२७ मार्च २०१२ 


*************************************************************************************

मुंबई 
२७ मार्च २०१२ 

*************************************************************************************