Tuesday, 22 December 2015

We don't teach many things in our schools and colleges


आपण मुलांना शाळा – कॉलेजमधे बरेच काही शिकवत नाही

- विवेक गोविलकर



सुप्रसिद्ध कथाकार शंकर पाटील यांची एक कथा आहे. वार्षिक परिक्षेत नापास झालेल्या एका मुलाचा शेतकरी बाप वर्गशिक्षकांकडे तक्रार घेऊन येतो. त्या बापाच्या मते मुलाला त्याच्या जीवनात आवश्यक असलेल्या कोणत्याच गोष्टी शाळेत शिकवत नव्हते. आणि त्याच्या दृष्टीने निरुपयोगी अशा गोष्टींवरच्या परिक्षेत मुलाला नापास करणे हा त्याच्यावर अन्याय होता. वर्गात पहिला आलेल्या मुलाला या नापास मुलाप्रमाणे शेतावरची कामे करता येतील का, म्हणून तो बाप वर्गशिक्षकाला आव्हानही देतो. शंकर पाटलांनी ही कथा विनोदी म्हणून लिहिली. पण त्या विनोदामागचा प्रश्न मात्र वास्तव होता. केवळ त्या शेतकऱ्याच्या मुलाबाबतच नव्हे तर सर्वच मुलांच्या दृष्टीने शाळा-कॉलेजमधे शिकवले जाणारे विषय आणि त्यांचा रोजच्या व्यवहारात होणारा उपयोग यामधे एक मोठी दरी आढळते. दरवर्षी लाखांनी पदवीधर आणि उच्चशिक्षित तयार होत असताना काही कित्येक कंपन्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत हेही याच समस्येचे लक्षण आहे. 

गेल्या शतकातील सुप्रसिद्ध तत्वज्ञ विल ड्यूरंट यांच्या मते शिक्षणाचा उद्देश चांगली माणसे तयार करणे हा असावा, केवळ विद्वान, पंडित निर्माण करणे हा नसावा. हा उद्देश केवळ नैतिक आणि तात्विक पातळीवर न रहाता, मुलांना व्यवहारज्ञान आणि व्यवहारोपयोगी कौशल्य मिळवायला मदत करणे हेही त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने त्याने असे सुचवले होते की प्रत्येक मुलाला घरात किरकोळ दुरुस्ती करता आली पाहिजे. त्यासाठी करवत, पाना अशी हत्यारे वापरुन सुतारकाम, प्लंबिंग अशा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी निदान प्राथमिक पातळीवर तरी शिकवल्या पाहिजेत.

आपल्याला आयुष्यात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मुलांना कधी नीट शिकवल्याच जात नाहीत. एकदा शालेय वय निघून गेले की तशी संधी पुन्हा मिळणे शक्य नसते. अर्थात शिकवण्यासारख्या विषयांची यादी इतकी मोठी आहे की हे सर्व विषय खोलात जाऊन शिकवणे शक्य नाही. पण निदान त्यांची तोंडओळख व्हावी आणि त्यातल्या काही विषयांचा ऐच्छिक विषयांच्या यादीत समावेश कसा करता येईल याचा विचारही व्हायला हवा. शिवाय शालेय वयातच मुलांना कला, साहित्य, शेती, विज्ञान, गणित, व्यवसायशास्त्र वगैरेमधून आपल्या आवडीच्या किंवा निवडीच्या विषयात विशेष नैपुण्य मिळवण्याची सोय करून दिली की पुढे शेती करणाऱ्या मुलावर व्याकरणाचा बोजा टाकणे किंवा चित्रकला, संगीत या विषयात पुढे काही विशेष करू शकतील अशी मुले गणिताच्या भीतीखाली गाडली जाणे या गोष्टी आपण टाळू शकतो.

कोणे एके काळी, मराठी शाळेत मुलामुलींना शिवणकाम आणि भरतकाम शिकवले जात होते. चित्रकला आणि हस्तकला यांचे वेगळे तास आणि त्यांच्या परिक्षाही असायच्या. संगीत वगैरे विषयाच्या स्वतंत्र परिक्षा नसल्या तरी स्वतंत्र संगीत शिक्षक असायचे. आज अनुदानित मराठी शाळांमधे संगीत, चित्रकला या विषयांसाठी त्या त्या  विषयात प्राविण्य असलेल्या स्वतंत्र शिक्षकांना व्यवस्थित पगार देऊन नेमण्यासाठी शाळांकडे पैसेच नाहीत. आणि शिक्षण विभागाकडून हे विषय ठेवायची सक्ती नसल्यामुळे प्रत्येक शाळा आपापल्या परीने या संदर्भातले निर्णय घेते. आज अनुदानित शाळांमधली स्थानिक राजकारणी लोकांची ढवळाढवळ आणि शिक्षकांना वेठीला धरून त्यांच्या डोक्यावर अनेक सरकारी कामे मारण्याची सध्याची पद्धत यामुळे ज्या कामाची सरकारी सक्ती नाही पण जी मुलांचा व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा स्वरूपाचे काही करण्याची शिक्षकांची इच्छा रहात नाही.

अनुदानित शाळांची ही परिस्थिती तर महापालिकेच्या शाळांची परिस्थिती याहूनही वाईट आहे. एका सार्वजनिक संस्थेने एका महापालिकेच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित केली. पाचवी आणि सहावीच्या मुलांना हातात कोरे कागद आणि रंगीत खडू दिल्यावर त्याचे काय करायचे असते हेच समजले नाही कारण त्या मुलांनी तोपर्यंत आयुष्यात एकही चित्र काढलेले नव्हते. चित्रासाठी विषय म्हणून तुमच्या घराचे किंवा शाळेचे चित्र काढा हे सांगूनही काही फरक पडला नाही. शेवटी एका शिक्षिकेने फळ्यावर खडूने घर काढले, झाड काढले तेव्हा ते बघून मुलांनी त्याप्रमाणे कागदावर काहीतरी काढायचा प्रयत्न केला.

इथे फक्त सरकार किंवा शाळा यांना दोष देऊन उपयोग नाही. याबाबतीत एका मुख्याध्यापिकेचा अनुभव सांगण्यासारखा आहे. त्यांच्या शाळेने ‘बागकाम’ या विषयासाठी एक स्वतंत्र तास ठेवला. शहरातल्या मुलांना आपल्या घरी बागकाम करण्याची संधी मिळत नाही ती मिळावी, आपल्या भोवतालच्या परिसरातल्या फुला-पानांची त्यांना ओळख करून द्यावी असा उद्देश त्यामागे होता. मात्र अनेक पालकांनी शाळेत येऊन, मुलांचा असा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांना भविष्यातल्या स्पर्धा परिक्षेसाठी उपयोगी पडतील अशा काही विषयांची तयारी करून घेण्याचा आग्रह धरला.

ज्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात फी आकारतात त्यांना आपल्या शाळेचे ‘मार्केटिंग’ करण्याची गरज असते. जर कुठल्या स्पर्धांमधल्या ढाली मिळाल्यामुळे शाळेची प्रतिमा उंचावत असेल तर अशा गोष्टींना प्राधान्य देण्याची या शाळांची प्रवृत्ती असते. क्विझ किंवा क्रिकेटसारखे क्रीडाप्रकार या गोष्टी याच कारणामुळे काही शाळांमधे विध्यार्थी आणि शिक्षकप्रिय असतात. अनुदानित शाळांमधे सुद्धा सातवीनंतर स्वतंत्र क्रीडाशिक्षक ठेवण्यासाठी सरकार मान्यता असल्यामुळे शारीरिक शिक्षणाचे तास तरी ठेवले जातात. अर्थात या तासांचा उपयोग अतिशय मर्यादित असतो. अमेरिकेतल्या शाळांमधे प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्यातरी क्रीडाप्रकारात विशेष सहभाग घेणे सक्तीचे असते. आपल्या शाळांमधे एका वर्गात ८० पर्यंत मुले असतात. त्या सर्वांना आपल्या आवडीचा खेळ रोज खेळण्यासाठी मैदाने आणि व्यायामशाळा याही मिळण्याची मारामार. मग लाकडी कोर्ट, कृत्रिम गवत, भरपूर खेळून झाल्यावर आंघोळीची सोय आणि जलतरण तलाव यांचा तर विचारही करणे शक्य नाही.

गेल्या काही वर्षात नव्या काळाला अनुसरून काही गोष्टी शाळेच्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेल्या दिसतात. त्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे संगणकविषयक प्राथमिक माहिती. पण तरीही शाळेची पुस्तके ही मुलांना आवडतील अशा स्वरूपात बनवण्यासाठी बरेच काही करायला वाव आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकांमधे रंगीत छपाई वगैरे असली तरी कोणत्या विषयाला स्वतंत्र महत्व देऊन त्या विषयाची मांडणी कशी करावी हे आपल्याच देशात NCERT ने बनवलेल्या पुस्तकांमधून शिकण्यासारखे आहे. त्या पुस्तकांचे सरळ चांगले भाषांतर केले तरी उपयोगी पडू शकेल. त्यांच्या पुस्तकांच्या यादीवरूनच CBSEच्या मुलांना किती आणि कशी चांगली पुस्तके मिळतात याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. सद्यस्थितीतला भारत, अर्थशास्त्रीय विकास समजून घेणे, भारत आणि सध्याचे जग, लोकशाही राजकारण, साधनसंपती आणि विकास, आपला भूतकाळ, सामाजिक आणि राजकीय जीवन, आपले पर्यावरण, पृथ्वी, निसर्ग आणि पर्यावरणाचा अभ्यास, आरोग्यशात्र आणि खेळ वगैरे.

इंग्रजी माध्यमाच्या मुलांना एखादी परदेशी भाषा शिकायची सोय आहे ती मराठी माध्यमाच्या मुलांना उपलब्ध नाही. (अर्थात त्यावरही काहीतरी वादग्रस्त धोरण आखायची सरकारची खोड काही जात नाही.) कोणतीही नवीन भाषा शिकणे चांगलेच. पण ‘मृत’ भाषा शिकण्यापेक्षा सध्याच्या जगातल्या आणि भविष्यात ज्या भाषेचे महत्व वाढेल अशा भाषेचा विचार आपण करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला कोणती भाषा शिकावी हा निर्णय घेताना मुले भविष्यातल्या उपयोगापेक्षा ‘स्कोअरिंग’चा विचार जास्त करतात हेही सत्य आहे.       

आपल्या शाळांमधे उद्योजकता या विषयावर काहीच बोलले जात नाही. कदाचित त्यासाठी तज्ञ शिक्षक मिळणे कठीण जात असेल. पण या विषयावर शाळकरी वयात मुलांच्या, विशेषतः मराठी मुलांच्या कानावर काहीतरी पडल्यास पुढच्या पिढीला तरी त्याचा फायदा होऊ शकतो. कंप्युटरची प्राथमिक माहिती आता मुलांना देतात. पण त्याच्या जोडीला इंटरनेटसारखे अतिशय शक्तीशाली माध्यम अतिशय धोकादायक कसे असू शकते आणि त्याचे व्यसन लागू शकते याबद्दल काही शास्त्रीय माहिती मुलांना देणे गरजेचे आहे.

त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबांमधे मुलांना आपल्या गोष्टी दुसऱ्यांबरोबर वाटून घ्याव्या लागत नाहीत. विशेष प्रयत्न केले नाहीत तर ही परिस्थिती मुलांना अत्यंत आत्मकेंद्री आणि स्वार्थी बनवू शकते. अशा वेळी इतरांचा सन्मान करणे, मानवी नातेसंबंधांमधला हिंसाचार टाळणे या गोष्टी मुलांना नीट समजाऊन सांगणे आवश्यक झालेले आहे. शरीर विज्ञानाची प्राथामिक्क माहिती शाळेच्या पुस्तकात असते. पण बदलत्या काळाची गरज म्हणून आरोग्यासंबंधी घ्यायची विशेष काळजी हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रश्न उद्भवतात. कंप्युटर आणि बैठ्या खेळांच्या अतिरेकामुळे होणारे पाठीचे आणि मानेचे आजार, असमतोल आहारामुळे येणारे स्थूलपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब हे प्रश्न आणि मुख्य म्हणजे लैंगिक शिक्षण या सर्वांची ओळख मुलांना करून दिली पाहिजे.       

शिक्षण हे केवळ शाळा कॉलेजमधे दिले जात नाही आणि ते तिथे पूर्ण होऊ शकत नाही. पहिली १५-१६ वर्ष शारीरिक, नैतिक, सांस्कृतिक बैठक तयार करण्यासाठी महत्वाचे असताना एका सुस्पष्ट ध्येयाच्या मागे लागून शिक्षणाचा पाया अतिशय संकुचित करण्यावर भर दिला जातो आहे. आज आपल्यावर माहितीचा भडीमार होतो आहे. पण खरा इतिहास आपल्या मुलांना शिकवला जातो आहे का हा प्रश्नच आहे. इतिहासाकडे पक्ष, जात आणि राजकीय विचारसारणीनुसार बघितले जात आहे. भ्रष्टाचार ही एक नैसर्गिक आणि वैश्विक गोष्ट आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची शिकवण कळत / नकळत मुलांना दिली जाते आहे का याबाबत काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठ्यांना वाकून नमस्कार करणे आणि त्यांना प्रश्न न विचारता त्यांचे सर्व बोलणे मान्य करणे ही जुनी शिकवण आता बदलत्या काळानुसार बदलायला पाहिजे. त्याच्या बदल्यात प्रश्न विचारणे, चौकस बुद्धी दाखवून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील रहाणे आणि स्वयंशिस्त यासाठी मुलांना उत्तेजन देईल अशा प्रकारची शिक्षणपद्धती आपण राबवायला पाहिजे. कुठलीही एक भाषा सर्वश्रेष्ठ किंवा स्वयंपूर्ण म्हणता येणार नाही. म्हणून मुलांना जगातल्या उत्तमोत्तम साहित्याचा त्यांना समजणाऱ्या भाषेतला अनुवाद उपलब्ध करून दिला पाहिजे. हॅरी पॉटरच्या कथांनी अमेरिकेसारख्या देशातही मुलांना वाचनाची गोडी लागू शकते हे सिद्ध झालेले आहे. त्यासाठी गरज आहे फक्त चांगल्या प्रकारे गोष्ट सांगण्याची.           

इंग्रजांना राज्य करण्यासाठी एतद्देशीय कारकुनांची गरज होई आणि त्यांनी त्या प्रकारचे शिक्षण दिले असा आरोप केला जातो. पण गेल्या काही दशकांची आपली वाटचाल पहाता तत्कालीन गरजांचा आपल्या शैक्षणिक विचारांवर प्रमाणाबाहेर परिणाम झालेला दिसतो. आय.टी. क्षेत्रामधे आंतरराष्ट्रीय मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याचे लक्षात येताच आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा वाढवला की लाखो तरुण इंजिनीअर बेकार राहिले आणि इंजिनीअरिंग कॉलेजमधल्या हजारो जागा रिकाम्या राहिल्या.             

अभियांत्रिकी, वैद्यक आणि व्यवस्थापन या लोकप्रिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आधीपासून तयारी करून घेण्याच्या नादात त्या त्या परिक्षेसाठी आवश्यक तेवढ्याच विषयांची तयारी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे इतिहास आणि भुगोलासारख्या विषयांना कमी महत्व दिले जाते. यासंदर्भात अमेरिकेचे उदाहरण विचारात घेण्यासारखे आहे. तिथल्या मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्याआधी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा एक कुठला तरी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्या अभ्यासक्रमात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान यांच्याबरोबर कॅल्क्युलस्, मानसशास्त्र आणि इंग्रजी याही विषयांचा समावेश असावा असा काही महाविद्यालयांचा आग्रह असतो. जवळपास ४० % विद्यार्थी जीवशास्त्र किंवा आरोग्यशात्र यापेक्षा वेगळ्या विषयाताली पदवी मिळवून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करतात.  

काही अमेरिकन विचारवंतांच्या मते भारतीय विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे समतोल नसले तरी गणित आणि विज्ञान या विषयांपुरते तरी ते प्रभावी आहे. अशा शिक्षणाचा सुरवातीच्या काळात बराचसा फायदा झालेला दिसला तरी भविष्याचा विचार करता ते कितपत बरोबर आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्याच्या काळात आय.आय.टी.चे ग्लॅमर काहीशा अवास्तव पातळीवर पोहोचल्यामुळे सुरवातीला राजस्थानातील कोटा आणि नंतर इतरही काही गावांमधे फक्त आय.आय.टी. प्रवेशपरिक्षेवर लक्ष केंद्रित करून आता सहावी सातवीच्या मुलांसाठी विशेष वर्ग सुरु केले जातात. मुंबईच्या काही प्रतिष्ठित शाळांमधूनही काही मुलांची निवड करून त्यांच्यावर काही वर्षे आय.आय.टी. प्रवेशपरिक्षेसाठी विशेष मेहनत घेतली जाते. एका दृष्टीने त्यात काही गैर नसले तरी दुसऱ्या बाजूने त्याचा अर्थ असा होतो की त्या मुलांना इतर कुठल्या विषयांचा अभ्यास करायची संधीच मिळत नाही. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे हे पदवीधर मुलामुलींनाही नक्की समजले असेल असे सांगता येत नाही. मग सहावी-सातवीपासून त्यांना फक्त आय.आय.टी.च्या दिशेनेच जायला लावणे कितपत योग्य आहे? विशेषतः लाखो परिक्षार्थी आणि फक्त काही हजार जागा ही परिस्थिती असताना?     

निदान आय.आय.टी.सारख्या संस्थांमधे अमेरिकेतल्या महत्वाच्या विद्यापीठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जोडीला साहित्य, भाषा, इतिहास, तत्वज्ञान हेही विषय शिकवले जातात. जेव्हा आयआयटीचा अभ्यासक्रम पाच वर्षाचा होता, तेव्हा पहिल्या वर्षी इंग्रजी, दुसऱ्या वर्षी तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र, तिसऱ्या वर्षी अर्थशास्त्र हे विषय अनिवार्य होते. चौथ्या आणि पाचव्या वर्षी अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, पर्यावरण अशा पर्यायांमधून कोणतेही चार विषय निवडणे अनिवार्य होते. आता मूळ अभ्यासक्रम चार वर्षांचा झाल्यामुळे या विषयांना थोडीशी कात्री लागलेली आहे. तरीही ध्वनी आणि प्रकाशचित्रण, भारतीय खगोलशास्त्र, सांस्कृतिक विकास, नवनिर्मिती आणि उद्योजगता, कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स या आणि अशा विषयांचा समावेश या चार वर्षांच्या अभ्यासक्रमात केलेला दिसतो. आय.आय.टी. मुंबईमधे वेळोवेळी झिया फरिदुद्दिन डागर, नयन घोष, वीणा सहस्रबुद्धे अशा दिग्गजांच्या मार्ग्दर्शनाचा लाभ संगीतप्रेमी विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. इतर इंजीनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मात्र अशी संधी मिळण्याची शक्यता फार कमी असते.

जीवनोपयोगी शिक्षणाची संधी शाळा-कॉलेजच्या बाहेरही कशी मिळू शकते याचे एक उदाहरण देता येईल. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेतर्फे ‘रोटरी यूथ एक्सचेंज’ हा उपक्रम भारतासह जगभर राबवला जातो. त्या त्या देशाच्या कायद्यानुसार पंधरा ते एकोणीस वर्षाच्या मुलांना यात भाग घेता येतो. या उपक्रमांतर्गत एखादा मुलगा किंवा मुलगी अमेरिका, कॅनडा, ब्राझील, इंग्लंड, जर्मनी अशा एखाद्या देशामधे एक वर्षासाठी जाऊन राहू शकतो. त्याची रहायची सोय तिथल्या एखाद्या कुटुंबात केली जाते. त्याला / तिला तिथल्या शाळेत जायची संधी मिळते. या वर्षभरात एक नवा देश, एक नवे कुटुंब, एक नवी शाळा, तिथल्या चालीरीती या सर्वांची माहिती त्या मुलामुलींना मिळते. (आपल्या देशातून अशा प्रकारे बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मुलामागे एक मुलगा / मुलगी इतर देशांतून आपल्या देशात वर्षभरासाठी येतात.) या वर्षभरात त्या मुलांना शिकण्याची एक फार मोठी अशी संधी मिळते. दुर्दैवाने १६-१७व्या वर्षी मुलांचे ११वी-१२वीचे महत्वाचे वर्ष ‘वाया’ घालवू नये असा आपल्याकडच्या पालकांचा दृष्टीकोन असतो.

चाकोरीबाहेरचे असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत. त्यांचा स्वीकार करणे किंवा न करणे हे आपल्यावर अवलंबून आहे. शाळेत जाणारे किंवा कॉलेजमधे प्रवेश घेणारे विद्यार्थी तर लहानच असतात. त्यामुळे पालक, शिक्षक, शिक्षणतज्ञ, विचारवंत, धोरण ठरवणारे राजकारणी आणि ते धोरण राबवणारे सरकारी अधिकारी या सर्वांनी मिळून आपल्या शिक्षणातल्या उणीवा दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.                 

**********