Monday, 15 October 2012

Rejoinder to Chandrakant Wankhade's article on Farmers' Suicides, Antarnad, October 2012


शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

श्री. चंद्रकांत वानखडे यांच्याअंतर्नाद” अंकातल्या "शेतकऱ्यांच्या आत्महत्या" या लेखाच्या संदर्भात काही विचार मांडावेसे वाटतात

सर्वप्रथम या लेखाबद्दल श्री. वानखडे यांचे अभिनंदन आणि आभार. आमच्यासारख्या शहरात आयुष्य घालवलेल्या लोकांसाठी हा लेख फार माहितीपूर्ण आणि विचार प्रवर्तक आहे. वानखडे यांची पोटतिडीक आणि कळकळ मनाला भिडणारी आहे. गावातल्या सावकारीचे दुसरे (चांगले) स्वरूप त्यांनी दाखवून देले आहे. शिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त जागतीकीकरणामुळे निर्माण झालेला नसून त्याचे स्वरूप स्वातंत्र्यापूर्वीचे किंवा खरे तर अनेक शतके चालत आलेले आहे हे त्यांनी तर्कशुद्धपणे दाखवून दिलेले आहे. श्री. वानखडे यांनी सुचवलेल्या मुद्यांवर व्यापक विचार होणे जरूर आहे

मात्र हा विचार करताना काही विरुद्ध मुद्दे आणि विसंगती लक्षात आल्या. त्या इथे मांडताना श्री. वानखडे यांच्याविषयी, त्यांच्या भावनेविषयी किंवा त्यांच्या विचारांविषयी अनादर दाखवायचा हेतू नाही. पण जर रोगाचे निदान कुठेतरी चुकत असेल तर उपाय योजना प्रभावी ठरू शकेल की नाही याचा विचार व्हावा एवढीच इच्छा आहे

प्रथम श्री.वानखडे म्हणतात त्याप्रमाणे गावात शेतकरी आहे त्याप्रमाणे शेतमजूर आहे. जेव्हा आपण ६५ ते ७० टक्के लोक शेतीवर जगतात असे म्हणतो तेव्हा त्यात हा शेतमजूरही असतो. आता शेतकरी आणि शेतमजूर यांचे हितसंबंध हे परस्पर पूरक किंवा विरोधीही असू शकतात. शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतकऱ्याला फायद्याचे तर मजुरीचा दर वाढणे हे मजुराच्या दृष्टीने फायद्याचे. या दोन्ही गोष्टी वाढणे हे ग्राहकाच्या खिशाला जड जाणार. या ठिकाणी शेतकरी हा शोषित आणि ग्राहक (विशेषतः शहरी) हा शोषक अशी अतिसुलभ मांडणी उपयोगाची नाही. मागणी-पुरवठा तत्वापासून पूर्णपणे फारकत घेऊन आपण कोणतीही समस्या सोडवू शकणार नाही

पुढे श्री. वानखडे म्हणतात, “उजव्या विचारसरणीच्या सर्व कन्सेप्ट्समध्ये शेतकरी खालच्या वर्गामध्ये आहे, क्षुद्र आहे.” आपण जर अमेरिका, पश्चिम युरोप आणि जपान मधल्या शेतकऱ्यांची शक्तिशाली लॉबी पाहिली तर हे विधान निदान त्या देशांमध्ये तरी लागू पडत नाही हे आपल्या लक्षात येईल. आणि हे सर्व देश पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे आहेत.  

श्री. वानखडे यांचा पुढचा आक्षेप असा की राठी साहित्यात शेतकऱ्याला स्थान  नाही आणि मराठी चित्रपटातले शेतकऱ्याचे चित्रण विकृत आहे. स्तुस्थिती काय आहे? अरुण सरनाईक, चंद्रकांत, सुर्याकांत अशा नायकांनी शेतकऱ्याचे अतिशय चांगले, आदर्शवादी चित्र आपल्या अनेक चित्रपटांमधून रंगवलेले आहे. सर्वसाधारणपणे दारुड्या, रंगेल, बलात्कारी दाखवलेला शेतकरी हा सर्वसामान्य शेतकरी नसून तो गावचा पाटील असतो. साहित्यात शेतकरी कुठेही  हिरो म्हणून येत नाही असे म्हणताना कथेचा नायक ही एक  व्यक्ती आहे की एक वर्ग आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिलेली "झाडाझडती" सारखी ठळक उदाहरणे आहेतच. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की शेतकऱ्यांच्या विरोधात संपूर्ण उर्वरित समाजाचे काही कारस्थान वगैरे नाही असा विश्वास शेतकऱ्यांचा मनात निर्माण होणे जरुरीचे आहेअसा विश्वास निर्माण झाल्याशिवाय समाजाकडून एकत्रित कृती होऊ शकणार नाही

श्री. वानखडे यांनी दिलेले दुधाच्या भावाचे उदाहरण महत्त्वाचे आहे. त्यांनी जर दुधाला १२ ऐवजी १४ रुपये दिले असते किंवा ते जेव्हा पिशवीतल्या दुधाला १८ रुपये देऊ लागले या दोन्ही वेळी शेतकऱ्याचा काही फायदा होण्याची नव्हती. जास्तीचे सर्व पैसे मधल्या लोकांनाच मिळाले असते. या मधल्या लोकांना आपण दलाल  म्हणून हिणवू शकतो. पण ही यंत्रणा पूर्णपणे नष्ट करणे कोणाच्याच फायद्याचे नाही. खेडा जिल्ह्यातला शेतकरी आणि भारतभर पसरलेला ग्राहक यांच्या मध्ये "अमूल"चे  असणे आवश्यक आहे

आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याचा विचार आपण पूर्वीसारखा एखाद्या स्वावलंबी बलुतेदारीने चालणाऱ्या खेड्याच्या संदर्भात करू शकत नाही. आजचा शेतकारी बियाणे, खते, कालवे, पंप, वीज, दळणवळण, बाजार, व्यापारपेठ, जागतिक  स्पर्धा, अनुदान, जागतिक बँक अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या सर्व गोष्टीं मध्ये कोणी एक तज्ञ असू शकत नाही. त्यामुळे "नांगरण", "वखरण"   माहिती नसलेला अर्थतज्ञ किंवा सिव्हील इंजिनीअर   त्याबाबतीत "अडाणी" असेलही. या लोकांना अडाणचोट म्हंटल्यामुळे एक धक्कातंत्राचा वापर होईल. पण त्यातून निष्पन्न काहीच निघणार नाही. स्वतःच्या शेतीबाबत जाणकार शेतकऱ्याला अडाणी म्हणू नये ही अपेक्षा मात्र  रास्त आहे

पुढचा महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या कर्जाचा आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज "योग्य" कारणासाठी घेतली जातात काय? शेतीची अवजारे, पंप, बियाणे यासाठीची कर्जे योग्य कारणासाठी म्हणता येतील. पण लग्नकार्य, मर्तिक , हुंडा, गाव जेवणे, प्रतिष्ठेच्या कल्पना यांसाठी घेतलेल्या कर्जांचे काय? यावर कोणी म्हणेल हा गावातल्या समाजव्यवस्थेचा अनिवार्य भाग  आहे. पण हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नसून मजुरांचासुद्धा आहे. एवढेच कशाला, क्रेडीट कार्ड बेजबाबदारपणे वापरणाऱ्या शहरी लोकांचाही आहे. त्यात अगदी अमेरीकेसारख्या देशातले लोक सुद्धा येतात

शेतकरी आत्महत्या हा सगळ्यात संवेदनाशील मुद्दा आहे. शेतकरी आत्महत्या का करतो? त्याच्या विचारसरणीत आणि प्रेमभंगामुळे, परिक्षेतल्या अपयशामुळे किंवा अपयशाच्या भीतीमुळे, शेअर बाजारातल्या करोडोंच्या नुकसानामुळे किंवा अशा अनेक कारणामुळे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीमध्ये काही फरक असतो का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनेक शतके होत  आहेत. त्यांच्या दर डोई संख्येत काही फरक पडला आहे काय? ज्या अडचणींमधून शेतकरी जात असतो त्याच अडचणींमधून त्याची पत्नीही जात असते. असे असताना आत्महत्या करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण खूप कमी दिसते याचे कारण काय असावे? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर कदाचित मूळ प्रश्न समजायला आणि त्यावरचे उपाय शोधायला मदत होईल

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना "आंदोलन" म्हणणे हा त्या दुर्दैवी घटनांच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होतो आहे असे खेदाने म्हणणे भाग आहे. कारण असे जर काही आंदोलन असेल तर ते गेली अनेक शतके चालू आहे आणि त्या अर्थाने ते फसले आहे याची जाणीव सर्व शेतकऱ्यांना करून देणे गरजेचे आहे

"बँकांचे दरवाजे शेतकऱ्यांना उघडायचे असतील, तर कर्जमाफी दिल्याशिवाय  हे होणार नाही." हे विधान मान्य करणे कठीण आहे. कर्ज माफी एखाद्यावेळी होऊ शकते. पण अनेक शतके चालत आलेला हा प्रश्न अशा एका कर्जमाफीने सुटणार नाही. कर्ज हे परत करण्यासाठी असते. शेतकऱ्याचे कर्ज हे "तुमचे" (शहरी लोकांचे?) पाप कसे याचा उलगडा लेखकाने केलेला नाही

आणखी एका मुद्द्यावर गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. जर ७० % लोक २५ % उत्पन्नावर जगात असतील  तर आपल्यापुढे दोन मार्ग आहेत. आपण असे समजू की ७० लोक (शेतकरी) २५ रुपये मिळवत आहेत आणि बाकी ३० लोक ७५ रुपये मिळवत आहेत. जर आपल्याला ७० % लोकांचे उत्पन्न एकूण उत्पनाच्या ७० % असायला हवे असेल तर हे होण्यासाठी  शेतकऱ्यांचे उत्पन्न सातपट वाढणे गरजेचे आहे. म्हणजे जर शेतकऱ्यांचे उत्पन्न २५ x १७५ रुपये झाले आणि बाकी उत्पन्न ७५ रुपये राहिले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न (१७५) हे एकूण उत्पन्नाच्या (१७५+७५=२५०) ७० % होईल. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न सातपट वाढवायची जादूची कांडी कोणाकडे असेल?

दुसरा मार्ग असा की शेतकऱ्यांना दुसरा काही रोजगार मिळवून देणे. जर ३५ % लोक शेतीच्या उत्पनावर अवलंबून राहिले आणि इतरांना दुसरा रोजगार मिळाला तर या प्रश्नाची तीव्रता कमी होऊ शकेल. यात अर्थात दोन अडचणी आहेत. () शेतीबाहेर इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. () शेतीमधली भावनिक गुंतागुंत योग्य प्रकारे हाताळली गेली पाहिजे.

या पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर कारखानदारी आणि सेवा यांच्या वाढीतून मिळवता येईल. तेही अर्थात सोपे नाही. पण दुसरा प्रश्न फारच गुंतागुंतीचा  आहे. याबाबत एक वस्थुस्थिती अशी आहे आज शहरात रहाणाऱ्या बहुतेकांचे आजे - पणजे हे शेतीवरच अवलंबून होते. शहरातली आजची पिढी ही पूर्णपणे शेतीपासून लांब गेलेली आहेदोन-चार-पाच एकराच्या शेतीवर चार जणांचे शेतकरी कुटुंब आरामात राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्या शेतकऱ्यांची, राजकारण्यांची  आणि समाजधुरीणांची हे मान्य करायला तयारी आहे काय

विवेक गोविलकर 


No comments:

Post a Comment