संपादक म.टा. यांस,
आपला "मराठी आणि जाणीवा" हा लेख आणि किरण नगरकर यांना जर्मन पुरस्कार मिळाल्याची बातमी या संदर्भात काही विचार मांडावेसे वाटतात. सर्व प्रथम किरण नगरकर यांचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राने नाही तर निदान जर्मनीने तरी त्यांचा सन्मान केला. नगरकर यांना मराठीत वाचक मिळाले नाहीत आणि त्यामुळे मराठीत कशाला लिहायचे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. याबाबत माझे निरिक्षण असे आहे.
"ककोल्ड" ही इंग्रजी कादंबरी "सात सक्कं त्रेचाळीस" या मराठी कादम्बरीपेक्षा साध्या सरळ शैलीत लिहिलेली आणि समजायला सोपी आहे. माहितीतला इतिहास, ओळखीची पात्रे आणि ओघवते कथाकथन यामुळे वाचक ककोल्ड या कादंबरीत रंगून जातो.
याउलट सात सक्कं ही कादंबरी ही सामान्य वाचक आणि समिक्षक यांच्यातली दरी स्पष्ट करून दाखवते. ठणठणपाळचा या कादंबरीवर एक सुरेख लेख आहे. त्यात त्यांनी मान्यवर समिक्षकांची अवतरणे दिलेली आहेत. सत्य कथेच्या जाहिरातीत, "जीवनातील असंबद्ध्तेचा सच्चेपणाने आणि धैर्याने शोध घेत जाणारी ..." असा उल्लेख आहे. मे.पु. रेगे म्हणतात, " .... तिच्यात कथानकाचे सूत्र नाही. .... या कादंबरीची भाषा ... काही झाकत नाही. काही सुशोभित करत नाही." भाऊ पाध्ये म्हणतात, "(ही कादंबरी) मस्तक गरगरवून टाकते." रा.भा. पाटणकर म्हणतात, "या विनोदाची जातही वेगळी आहे. जीवनातली अतिभौतिकीय असंबद्धता आणि मृत्यूचे सावट यांच्यातून तो निर्माण झालेला आहे."
म्हणजे इंग्रजी वाचकांसाठी एक काल्पनिक आणि ऐतिहासिक सर मिसळ असलेली रसाळ कथा आणि मराठी वाचकांसाठी कुशंक,आरोती, अर्षदा, पृथा, रु शंद अशा नावाच्या पात्रांची, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांचे धक्के देणारी, "उध्वस्त करणारा अनुभव" देणारी समिक्षक-प्रिय कादंबरी. मग ती सर्व सामान्य मराठी वाचकांनी वाचली नाही तर त्यांना दोष कसा द्यावा?
अर्थात ककोल्डचा मराठी अनुवाद लोकांनी का वाचला नाही हे समजायला मार्ग नाही.
माझी नगरकर यांना अशी विनंती आहे की त्यांनी "ककोल्ड" किंवा "रावण अँड एडी" सारख्या कादंबऱ्या मराठीतही लिहाव्यात.
मुंबई
No comments:
Post a Comment