Monday, 23 November 2015

Why we don't have Satya and Sunder in India - Lokmudra Diwali 2015

http://issuu.com/lokmudra/docs/lokmudra_nov_dec_2015

सत्या आणि सुंदर भारतात का होत नाहीत?

- विवेक गोविलकर


जन्माने भारतीय असलेल्या सत्या नाडेला यांची गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीच्या प्रमुखपदी निवड झाली. जन्माने भारतीय असलेल्या सुंदर पिचाई यांची नुकतीच गुगल या दुसऱ्या एका बलाढ्य कंपनीच्या प्रमुखपदी निवड झाली. त्या निमित्ताने भारतीय लोकांचे कर्तृत्व, या सध्या लोकप्रिय असलेल्या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या दोन घटना विशेष का आहेत हे समजून घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन कंपन्या नक्की काय आणि कशा आहेत हे आपण समजुन घेतले पाहीजे. केवळ या दोन कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य हे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पनाच्या ४२ % इतके आहे. अमेरिकेचे इंटरनेटवरचे २५ % व्यवहार एकट्या गुगलच्या मार्फत होतात. गेल्या काही वर्षात गुगलने सरासरी दर आठवड्याला एक कंपनी या हिशेबाने शंभरावर कंपन्या विकत घेतल्या आहेत. व्यावसायिक, शैक्षणिक आणि घरगुती वापरासाठी जगातले एक अब्जहून अधिक लोक मायक्रोसॉफ्टची ‘ऑफिस’ ही प्रणाली वापरतात. जगभरातल्या ९० % पर्सनल कंप्युटरवर वापरल्या जाणाऱ्या ‘विंडोज’ या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टमला पहिल्यांदा शह दिला तो ‘अँड्रॉईड’ने. स्मार्टफोन आणि टॅब्लेट या आकाराला छोट्या उपकरणांचा कंप्युटरच्या बाजारात स्फोटक असा प्रसार झाल्यामुळे अँड्रॉईडला हे शक्य झाले. आणि अँड्रॉईड ही ऑपरेटिंग सिस्टम तयार करणारी कंपनी पुन्हा गुगलच !!

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ अनेक भारतीय लोक उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे. पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या बदललेल्या समिकारणामुळे अमेरिका आणि रशिया यांचा नव्या महासत्ता म्हणून उदय झाला. १९६०च्या दशकात खऱ्या अर्थाने भारतीय लोकांनी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने अमेरिकेला जायला सुरवात केली. त्यात उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्यांची मोठीच मदत झाली. अमेरिकेची आत्यंतिक श्रीमंती आणि परदेशी नागरीकांना आधी नोकरीसाठी परवाने आणि मग नागरिकत्व देण्याच्या अमेरिकेच्या खुल्या धोरणामुळे अमेरिकेत कायमचे स्थायिक होणाऱ्या भारतीय लोकांची संख्या वाढत गेली. १९७०च्या दशकात आफ्रिकेतल्या अनेक देशांमधे स्थायिक झालेल्या भारतीयांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. इडी अमीन या हुकुमशहाने तर युगांडा देशातून सर्व भारतीय लोकांना हाकलून दिले. त्यामधे गुजराथी व्यापारी समाजाचा भरणा होता. यातले अनेक लोक आपल्या चरितार्थासाठी अमेरिकेत जाऊन पोहचले. त्या लोकांनी प्रामुख्याने ‘मोटेल’ आणि रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तुंची दुकाने अशा प्रकारच्या व्यवसायात हळूहळू पण निश्चितपणे जम बसवला.

१९८०च्या दशकात अमेरिकेतल्या मूळ भारतीय लोकांची संख्या लक्षणीय होती. पण हे लोक एकतर छोटे व्यवसाय किंवा नोकरी करताना दिसायचे. भारतातल्या चांगल्या विद्यापीठातून घेतलेली पदवी आणि अमेरिकेतल्या विद्यापिठातून परिश्रमपूर्वक मिळवलेली उच्च पदवी यामुळे भारतीय लोकांनी चांगल्या नोकऱ्या मिळवल्या. कामातले कौशल्य आणि मेहनत याच्या जोरावर त्यांनी नोकरीतही चांगली प्रगती केली. असे जरी असले तरी भारतीय लोकांची प्रगती एका विशिष्ट पातळीवर येऊन थांबलेली दिसायची. भारतीय लोकांचे तांत्रिक कौशल्य मान्य करुनही त्यांची व्यवस्थापकीय आणि आर्थिक क्षेत्रातल्या प्रमुखपदावर नेमणूक होताना फारशी दिसली नाही. भारतीय लोकांची ओळख एक चांगला इंजिनीअर, चांगला डॉक्टर, चांगला प्राध्यापक किंवा एखाद्या मोटेलचा किंवा कोपऱ्यावरच्या दुकानाचा मालक अशीच राहिली.              

१९९०च्या दशकात परिस्थिती बदलायला सुरवात झाली. तरुण वयात अमेरिकेत जाऊन स्थायिक आलेले अनेक भारतीय लोक विविध कंपन्यांमधे वरिष्ठ पदांवर काम करत होते. त्या पिढीची मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरीधंदा करण्याच्या वयाची झाली होती. अमेरिकेत व्यवसाय केलेल्या पहिल्या भारतीय पिढीचे लोक आपल्या अनुभवांचा फायदा नव्याने व्यवसाय करू पहाणाऱ्या भारतीय लोकांना द्यायला उपलब्ध झालेले होते. १९८०च्या दशकात घडलेल्या दुसऱ्या एका शांततामय क्रांतीचा विचार करणे येथे अपरिहार्य आहे. या दशकात भारतीय आय.टी. व्यवसायाला बहर आला. अमेरिकेत शिक्षण न घेतलेले अनेक तरुण इंजिनीअरसुद्धा अमेरिकन व्यवस्थापकांच्या थेट संपर्कात आले. त्यातल्या अनेक लोकांनी भारतातल्या नोकऱ्या सोडून अमेरिकन कंपन्यांमधे नोकऱ्या घेतल्या. अनेक अमेरिकन आणि युरोपिअन कंपन्यांनी आपले आय.टी. विभाग थेट भारतात सुरु केले. विचार आणि माहिती यांची देवाणघेवाण आणि तरुण, हुशार भारतीय लोकांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव यामुळे दुरावा कमी झाला. १९९०च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था मोकळी व्हायला सुरवात झाली. ‘जनरल इलेक्ट्रिक’सारख्या कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात भारतात गुंतवणूक करायला सुरवात केली. ‘आउटसोर्सिंग’ मॉडेल चांगल्याप्रकारे विकसित झाले. तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांनी नव्या बाजारपेठा तयार केल्या. ग्राहकांचे समाधान करण्याठी अमेरिकेच्या वाढत्या मागणीपेक्षा देशांतर्गत पुरवठा कमी पडल्यामुळे कसबी इंजिनीअर मिळवण्यासाठी त्यांना जगभर, विशेषतः भारतात प्रयत्न करावे लागले. अशा प्रकारे भारतीय लोकांना सर्व पातळ्यांवर अधिकाराच्या जागा मिळण्यासाठी अनुकुल असे वातावरण तयार झाले.

सत्या आणि सुंदर यांच्या जोडीला अमेरिकेत सर्वोच्च पदावर पोहणारे इतरही अनेक भारतीय लोक आहेत. इंद्रा नुयी (पेप्सिको), अजयपालसिंग बांगा (मास्टरकार्ड), रश्मी सिन्हा (स्लाईडशेअर), विनोद खोसला (सन मायक्रो), शंतनू नारायण (अडोबी), पद्मश्री वॉरियर (सिस्को), राजीव सुरी (नोकिया) या लोकांनी आपापल्या कंपन्यांमधे सर्वोच्च्च पदावर आपला अधिकार प्रस्थापित केलेला आहे. व्हिक्टर मिनेझेस हे सिटीबँकेच्या व्हाईस चेअरमन या पदापर्यंत पोहचले तर विक्रम पंडित सिटीबँकेच्या प्रमुख पदावर काही काळ होते. सबीर भाटीया यांनी स्वतः विकसित केलेली ‘हॉटमेल’ मायक्रोसॉफ्टला डॉलरच्या आजच्या किमतीच्या हिशेबाने सुमारे २४ अब्ज रुपयांना विकून खळबळ माजवून दिली होती. इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली शिक्षा होऊन बदनाम झालेले रजत गुप्ता हे सुद्धा मॅक्किन्सीच्या प्रमुखपदी आणि इतर अनेक कंपन्यांच्या बोर्डावर होते.  

हे सर्व लोक भारतात जन्मले पण त्यांनी अमेरिका ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. (फक्त राजीव सुरी हे नोकरीसाठी फिनलंडमधे रहातात.) या सर्वांच्या उदाहरणावरून काही प्रश्न लगेचच लोकांच्या मनात निर्माण होतात. ज्या भारतीय लोकांनी परदेशात एवढे यश मिळवले त्यांना हे भारतात करणे का जमले नाही? भारतात काही करणे आपल्याला जमणार नाही असे त्यांना का वाटले? भारतात त्यांच्या गुणांना वाव का मिळत नाही? अमेरिकेसारखे उद्योजकतेला अनुकूल वातावरण आपल्याकडे का निर्माण करता येत नाही? या सर्व यशस्वी लोकाच्या यशाचे रहस्य काय? त्यांच्यात काही समाईक गुणवैशिष्ट्ये आहेत का?

सर्वप्रथम एक गोष्ट आपल्या नजरेत भरते ती म्हणजे हे सर्व लोक उच्च शिक्षित आहेत. बहुतेकांच्या भारतातल्या शिक्षणाला आय.आय.टी. आणि आय.आय.एम. या जगविख्यात भारतीय संस्थांचा पाया आहेच. पण त्यांनी अमेरिकेतल्या प्रथम श्रेणीच्या विद्यापीठातून एम.एस., एम.बी.ए. किंवा पीएच.डी. अशा पदव्या मिळवलेल्या आहेत. सत्या (युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो), इंद्रा नुयी (येल), सुंदर (व्हॉर्टन, स्टॅन्फर्ड), रजत गुप्ता (हार्वर्ड), रश्मी सिन्हा (बर्कली, ब्राऊन), विनोद खोसला (स्टॅन्फर्ड, कार्नेगी मेलन), शंतनू नारायण (बर्कली), पद्मश्री वॉरियर (कॉर्नेल), सबीर भाटीया (कॅलटेक, स्टॅन्फर्ड), व्हिक्टर मिनेझेस (स्लोन्स), विक्रम पंडित (कोलंबिया) ही यादी बघितल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अशा प्रकारच्या शिक्षणाची सोय भारतात उपलब्ध नाही.

भारतातल्या अनेक बड्या कारखानदार आणि उद्योजकांची सुरवात शून्यातून झालेली असली तरी पुढच्या पिढीला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची परंपरा टाटा, बिर्ला, अंबानी, महिंद्रा या बहुतेक सर्व घराण्यांमधे दिसते. प्रस्थापित उद्योजकांच्या घरात जन्मलेल्या मुलांना परदेशात शिक्षण घेऊन परत आल्यावर कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय त्यांची वाट पहात असतो. मध्यमवर्गातून पैसा खर्च करून किंवा कर्ज काढून परदेशात गेलेल्यांना मात्र तशी सोय नसते. आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची जेवढी संधी त्यांना परदेशात मिळते तेवढी भारतात मिळणार नाही असे त्यांना वाटत असावे.

अर्थात परदेशातली पदवी नसताना शून्यातून सुरवात करून प्रचंड यश मिळवणारे नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, शिव नाडर अशीही उदाहरणे आहेत. पण अशी उदाहरणे तुलनेने कमी आहेत. शिवाय मूर्ती किंवा नंदन यांनीही आय.आय.टी. सारख्या संस्थेमधून शिक्षण घेतलेले आहे. या ठिकाणी या सर्व यशस्वी लोकांची उद्योजक आणि पगारदार अशी विभागणी करायला हवी. उद्योजक हा धोके पत्करून स्वतःच्या हिमतीवर काही निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला रीतसर किंवा उच्च शिक्षणाची पूर्वअट नसते. पुढच्या पिढ्यांचे उद्योजक शिक्षणाचा फायदा ओळखून उच्च शिक्षणाची वाट पकडतात. पण पगारदार लोकांना मात्र नोकरी मिळवण्यासाठीच चांगल्या पदवीची आवश्यकता असते. सुरवातीला ज्या परदेशात यश मिळवणाऱ्या लोकांचा उल्लेख आलेला आहे, त्यापैकी रश्मी सिन्हा आणि सबीर भाटीया हे खरे उद्योजक आहेत. विक्रम पंडित यांनी उद्योजक आणि पगारदार या दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. बाकी सर्व लोक पगारदार आहेत, तरीही त्यांच्या यशाची एवढी चर्चा होताना दिसते.   

भारतात आता चित्र बदलत असले तरी अजुनही नोकरी म्हंटली लोकांच्या मनात आठ तासांची खर्डेघाशी, सुरक्षितता आणि मर्यादित उत्पन्न अशीच कल्पना येते. सत्या किंवा सुंदर यांच्या ‘पगाराचे’ आकडे बघितले तर सर्वसामान्यांचे डोळे फिरु शकतात. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार वार्षिक पगार, बोनस आणि स्टॉक ऑप्शन्स धरून सुंदर यांना वर्षाला सुमारे सव्वातीनशे कोटी तर सत्या यांना सुमारे साडेपाचशे कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात बोनस द्यायच्या अमेरिकन पद्धतीमुळे पगारदार आणि उद्योजक यांच्यातल्या सीमारेषा निदान अत्युच्च पातळीवर काहीशा धूसर होताना दिसतात. असे असले तरी नारायण मूर्ती आणि शिव नाडर हे इतरांना पगार देणारे आहेत आणि सत्या किंवा सुंदर हे पगार घेणारे आहेत हा फरक उरतोच. मग असा प्रश्न निर्माण होतो की काही अपवाद वगळता आपल्याकडे उद्योजक आणि सत्या-सुंदरसारखे पगारदारही का निर्माण होत नाहीत?  

या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. केवळ उद्योग क्षेत्रातच नाही तर आपल्याकडे नोबेल पुरस्कार विजेतेही फारसे होताना दिसत नाहीत. टागोर आणि रामन यांचा अनेक दशकांपूर्वीचा अपवाद सोडला तर भारतीय वंशाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांनीसुद्धा इंग्लंड किंवा अमेरिका या देशांनाच आपली कर्मभूमी मानलेली आहे. अमर्त्य सेन सोडता खोराना, चंद्रशेखर, रामकृष्णन या नोबेल विजेत्यांनी तर अमेरिकेचे नागरिकत्वही स्वीकारले होते. सत्या आणि सुंदर यांच्यासह इतरही अनेकांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेले दिसते.       

नोबेल विजेते शास्त्रज्ञ आणि परदेशात यशस्वी झालेले मॅनेजर या सर्वाना भारतात भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे चांगली शिक्षणपद्धती, सुसज्ज वाचनालये, प्रयोगशाळा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणाचा अभाव. आय.आय.टी. चा बराच गाजावाजा होत असला तरी जागतिक क्रमवारीत पहिल्या ३०० विद्यापिठांमधे फक्त तीन आय.आय.टी.चा समावेश होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. आय.आय.एम.ची परिस्थिती तुलनेने चांगली असली तरी भरमसाट वाढलेल्या शिक्षणाच्या कारखानदारीमुळे बहुतेक नव्या शिक्षणसंस्थांमधे शिक्षणाचा दर्जा सांभाळलेला दिसत नाही. ऑक्स्फर्ड विद्यापीठ नऊशे वर्षांपूर्वी बांधले गेले. केंब्रिज आठशे वर्षांपूर्वी, हार्वर्ड पावणेचारशे तर येल तीनशे वर्षांपूर्वी बांधले गेले. या विद्यापिठांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांच्याबरोबर तुलना करायची नाही असे म्हंटले तरी सव्वाशे वर्षांपूर्वीचे स्टॅन्फर्ड किंवा कॅलटेक, दीडशे वर्षांपूर्वीचे कॉर्नेल किंवा एम.आय.टी. आणि आपल्याकडचे सव्वाशे वर्षांपूर्वीचे व्ही.जे.टी.आय. किंवा दीडशे वर्षांपूर्वीचे सी.ओ.ई.पी. यांची तुलना करायला हरकत नाही.

दुर्दैवाने आय.आय.टी. धरूनसुद्धा आपल्याकडे संशोधन आणि प्रयोगासाठी लागणारी सामुग्री जागतिक विद्यापिठांच्या मानाने कमीच आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र अशा कोणत्याही विषयात भारतातून प्रसिद्ध होणारी जागतिक प्रतिष्ठेची अशी एकही पत्रिका (Journal) नाही. त्यामुळे आपल्याकडे जे काही तुटपुंजे संशोधन चालते ते कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध होण्यातच आपला गौरव आहे अशी भावना भारतीय शास्त्रज्ञांच्या मनात निर्माण झाली तर नवल नाही. वेगवेगळ्या विद्यापीठात समन्वय नाही, दीर्घ पल्ल्याचे धोरण नाही, राजकारण्यांचा वारंवार होणारा हस्त्क्षेप यामुळे आय.आय.टी.सारख्या संस्थांचा लौकिकसुद्धा भविष्यात धोक्यात येऊ शकतो अशी भीती काहींना वाटते. अनेक खाजगी कॉलेजांमधे कायमस्वरूपी प्राध्यापक नेमण्यात टाळाटाळ केली जाते. शिक्षणसंस्था आणि उद्योगजगत यांच्यात देवाणघेवाण असली पाहिजे असे सर्वजण बोलतात. पण अमेरिकेत मोठमोठ्या कंपन्या नामांकित विद्यापिठांबरोबर काम करून मोठ्या प्रमाणात संशोधन करतात त्यामानाने आपल्याकडे हे प्रमाण नगण्य आहे. आपल्याकडे एकूणच संशोधनक्षेत्राविषयी मोठ्या प्रमाणात अनास्था आहे. या सगळ्याचा आपल्या शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होणे हे अपरिहार्य आहे.

एखादी वेगळी, काहीशी विचित्र वाटणारी कल्पना घेऊन तिचा पाठपुरावा करणे, प्रस्थापित मतांच्या विरुद्ध जाणे, मोठ्यांना प्रश्न विचारून आव्हान देणे अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळणे आपल्याकडे शक्यच नसते. मोठ्यांचा आदर करणे म्हणजे ते म्हणतील ते तसेच्या तसे स्वीकारणे हे मुलांच्या मनावर ठसवले जाते. याचा परिणाम म्हणजे शालेय वयात पालक आणि शिक्षक, प्रौढ वयात कोणी बाबा आणि गुरु आणि ऑफिसमधे बॉस यांचा शब्द प्रमाण मानणे हाच मार्ग बहुतेक लोक निवडतात. सरकारी नियम आणि प्रथा यापुढे तर शहाणपणच चालू शकत नाही. अनेक कालबाह्य कायदे आणि नियम कसे निर्बुद्धपणे राबवले जातात याचे एक छोटेसे उदाहरण देता येईल. स्मार्टकार्डच्या जमान्यातसुद्धा कर्मचाऱ्यांची हजेरी कागदी वहीतल्या हजेरीपटावर सही करूनच नोंदवली गेली पाहिजे असा नियम बदलायची कोणी तसदी घेत नाही. आपले कालबाह्य कामगारविषयक कायदे हा तर फार मोठा विषय आहे.

या वातावरणात पूर्णपणे नवीन काही करणे हे अत्यंत कठीण होऊन बसते. ज्यांना काही आर्थिक किंवा संस्थात्मक पाठबळ नाही असे तरुण उद्योजक कसे बनणार? अमेरिकेत जर तुमच्याकडे एखादी नवीन कल्पना असेल आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला आर्थिक, कायदेशीर, विक्री वगैरे प्रकारचे सहाय्य करायला अनेक लोक आणि संस्था तयार असतात. मोठ्या कंपन्यांमधे नोकरी करणाऱ्या लोकांनासुद्धा कोट्यावधी रुपयांचे ‘बजेट’ देऊन नव्या कल्पना आणि उत्पादने विकसित करायला प्रोत्साहन दिले जाते. यशस्वी कल्पना राबवून झालेल्या नफ्याचा काही हिस्सा कर्मचाऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्यातल्या उद्योजकतेला पूर्ण वाव मिळतो.    

भारतीयांमधे नवनिर्मितीक्षमता नाही असा आरोप केला जातो. तो एका अर्थाने बरोबर आहे आणि एका अर्थाने चुकीचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढून ज्या प्रकारच्या क्लुप्त्या लोक लढवतात त्या आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. आपले सुतार, गवंडी, मोबाईल दुरुस्त करणारे असे अनेक लोक ज्या प्रकारे डोके लढवतात त्यावरुन त्यांच्यात कल्पनाशक्ती किंवा निर्मितीक्षमता नाही असे म्हणता येणार नाही. पण अशा प्रकारच्या कामातून काही इतर प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे त्यातून कामचालाऊ, तात्पुरता असा ‘देशी’ उपाय मिळतो, पण आय-फोनसारखी क्रांतीकारी निर्मिती होऊ शकत नाही. त्यातून फक्त ‘चलता है’ स्वरूपाची निर्मिती कशी होते याचे एक उदाहरण म्हणजे पंजाबमधल्या काही शेतकऱ्यांनी डीझेलवर चालणाऱ्या पंपाचा इंजिनसारखा वापर करून बेकायदेशीरपणे तयार केलेला ट्रक. अशा निर्मितीतून सुरक्षितता, पर्यावरण यांचा विचार होत नाही. शिवाय आपले सुपीक डोके वापरून कायद्याला हुलकावणी द्यायचा प्रयत्नही त्यातून दिसतो. अशा कल्पक लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून काहीतरी चांगले करायला वाव जितका अमेरिकेत मिळू शकेल तितका आपल्याकडे मिळू शकत नाही.                                                           

भारतात सुंदर किंवा सत्या नाहीत असे म्हणताना मुख्यत्वाने त्यांच्या उत्पनाचा विचार केला जातो असे वाटते. इन्फोसिस ही भारतातील एक महत्वाची कंपनी आहे. गुगलचे जगभरात सुमारे ५४,००० कर्मचारी आहेत आणि मायक्रोसॉफ्टचे १,२८,००० कर्मचारी आहेत. यांच्या तुलनेत इन्फोसिसचे १,७९,००० कर्मचारी आहेत. त्या दृष्टीने इन्फोसिसचे प्रमुखपद ही जास्त मोठी जबाबदारी आहे. मात्र एकूण उत्पन्नाचा विचार केला तर २०१४ चे गुगलचे सुमारे ४२२४ अब्ज रुपयाचे उत्पन्न हे इन्फोसिसच्या ४७० अब्ज रुपये या उत्पन्नाच्या नऊपट आहे. मायक्रोसॉफ्टचे ५९८० अब्ज रुपये उत्पन्न हे इन्फोसिसच्या उत्पन्नाच्या साडेबारापट आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार इन्फोसिसचे प्रमुख विशाल सिक्का यांचे पगार, बोनस आणि स्टॉक ऑप्शन्स धरून एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे ४५ कोटी आहे. म्हणजे सुंदर यांचे उत्पन्न त्यांच्या सातपट आहे आणि सत्या यांचे उत्पन्न त्यांच्या सव्वाबारापट आहे. याचा अर्थ इन्फोसिसच्या नऊपट उत्पन्न असलेल्या गुगलच्या प्रमुखाला सातपट जास्त उत्पन्न मिळते आणि साडेबारापट उत्पन्न असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखाला सव्वाबारापट उत्पन्न मिळते. थोडक्यात म्हणजे कंपनीचे उत्पन्न आणि प्रमुख अधिकाऱ्याला मिळणाऱ्या पगाराचे प्रमाण यात भारत आणि अमेरिका यांच्यात काही विशेष फरक दिसत नाही. या दृष्टीने विचार केला तर आपल्या देशात राहून सुंदर किंवा सत्या तयार होण्यासाठी गुगल किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या भारतात निर्माण व्ह्यायला पाहिजेत असे आपण म्हणू शकतो.             

मग प्रश्न असा येतो की गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट भारतात का निर्माण होत नाहीत? आधी दिलेल्या कारणांबरोबर बाजारपेठेचा विचारही येथे केला पाहिजे. एकूणच भारतीय आय.टी. कंपन्यांच्या उत्पन्नातला फार मोठा भाग निर्यातीमधुन म्हणजे जागतिक बाजारपेठेतून येत असतो. याउलट बड्या अमेरिकन कंपन्यांच्या उत्पन्नातला मोठा भाग हा अमेरिकेच्या बाजारपेठेतूनच मिळत असतो. आज तरी भारतीय बाजारपेठ अमेरिकेच्या तुलनेत बरीच लहान आहे. आणि अमेरीकन बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांबरोबर टक्कर घेणे हे अतिशय कठीण काम आहे. भारतीय बाजार आणि मानसिकता ही प्रामुख्याने ‘स्वस्त आणि मस्त’ अशा स्वरूपाची आहे. येथे ही विचारसरणी बरोबर आहे की चुकीची हा मुद्दा नाही. अनेक शतकांच्या दारिद्रयामुळे काटकसर हा गुण मानला जाणे स्वाभाविकच आहे. समाजातल्या ज्या थोड्या लोकांच्या हातात अतिरिक्त पैसा खेळायला लागला त्यांनी तो मुक्त हस्ताने खर्च केल्यावर ‘धनदांडगे’, ‘चंगळवादी’ वगैरे विशेषणे त्यांना बहाल केली जातात. ‘ज्याला कोणाला पैसा कमवायचा आहे त्याला अमेरिकेत तशी पूर्ण संधी मिळेल’ ही अमेरिकेची भूमिका आहे. कायद्याची चौकट ही लोकांना पैसे मिळवण्यापासून रोखण्यासाठी नसून कोणाची फसवणूक होऊ नये किंवा गुन्हेगारी मार्गाने पैसा मिळवला जाऊन नये एवढ्यासाठीच आहे. ‘नफा मिळवणे हाच सामाजिक गुन्हा आहे’ या भूमिकेच्या ती पूर्णपणे विरुद्ध आहे. आज आपली काय भूमिका असावी याबाबत आपल्या मनात एक समाज म्हणून संदेह आहे.

पुन्हा एकदा, ‘नफ्याच्या बाजूने’ किंवा ‘नफ्याच्या विरुद्ध’ यापैकी बरोबर काय आणि चूक काय या वादात न पडता वस्तुस्थिती काय आहे याचा विचार केला तर काय दिसते? भारतातली परिस्थिती गुअल, मायक्रोसॉफ्ट किंवा अॅपल तयार व्ह्यायला आणि पर्यायाने सुंदर किंवा सत्या निर्माण व्ह्यायला अनुकूल नाही हे मान्य करावे लागेल. आणि आपल्याला सुंदर किंवा सत्या भारतात निर्माण व्ह्यायला हवे आहेत की नाही हे आधी ठरवावे लागेल.

ज्या चीन देशाने जुनी समीकरणे मोडीत काढून जागतिक अर्थसत्ता म्हणून मुसंडी मारली त्या चीन देशाचे लोक भारतीयांच्या तुलनेत फार कमी संख्येने अत्युच्च पदावर पोहचलेले दिसतात. याचे कारण काय असावे याचाही विचार होणे आवश्यक आहे. गेल्या दशकात अमेरिकन विद्यापिठांमधे शिकायला आलेल्या चीनी विद्यार्थ्यांची संख्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ च्या एका लेखानुसार चीनी विद्यार्थ्यांचा कल बिझनेसकडे तर भारतीय विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंगकडे असतो. अजूनतरी भारतीय लोकांना इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वाचा फायदा मिळताना दिसतो. संस्कृत आणि लॅटीन भाषेतल्या साधर्म्यामुळे भारतीय भाषा बोलणाऱ्या लोकांना इंग्रजी बोलणे तसे सोपे असते. चीनी भाषा ही इतकी वेगळी आहे की त्यांना इंग्रजी बोलणे फारच कठीण जाते. यावर चीनी लोक कशाप्रकारे आणि किती लवकर मात करतील हा प्रश्न आहे. पण सध्यातरी भारतीय लोकांचे पारडे त्या बाबतीत जड आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या देशात परत आल्यावर मिळणारी संधी. सध्या चीनमधे होणाऱ्या आर्थिक उलथापालथीचे पडसाद राजकीय अस्थिरतेत उमटले, तर अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या चीनी लोकांची संख्या वाढू शकते. अमेरिकेत जन्मलेल्या त्यांच्या मुलांना भाषेचा प्रश्नही पडणार नाही. त्यामुळे आजचे चित्र पंधरावीस वर्षांनी अगदी वेगळे दिसू शकेल. भारतापुरता विचार केला तर जेव्हा अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेपेक्षा भारतात जास्त चांगली (पैसे मिळवायची) संधी आहे असे वाटेल तेव्हा त्यातल्या अनेकांना भारतात परत यावेसे वाटेल. आणि त्यावेळी सत्या आणि सुंदर भारतात निर्माण होण्याची शक्यता वाढेल.        

शेवटी भारतीय लोकांनी आपला झेंडा अमेरिकेत आणि पर्यायाने जगभर फडकवला असा स्वरूपाचा भावनात्मक आनंदोत्सव साजरा करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. सत्या, सुंदर आणि इतर अनेक यशस्वी लोकांनी आणि नोबेल विजेत्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले होते. त्यांनी जे परदेशात करून दाखवले ते त्यांना भारतात करून दाखवता आले नाही. त्यासाठी आपली व्यवस्था प्रामुख्याने जबाबदार आहे हे खुल्या मनाने मान्य करून त्यासाठी आपण काही तोडगा काढला पाहिजे. सत्या आणि सुंदर यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा जॅक वेल्श आणि ली आयाकोका यांच्यासारखे अत्यंत यशस्वी मानले गेलेले मॅनेजर चांगल्या संधीसाठी भारतात येतील तेव्हा तो आपण आपला खरा विजय मानला पाहिजे.  

**********

No comments:

Post a Comment