Monday, 2 November 2015

Preface to 'Vinayak Dattatray Govilkar yaanchee kavitaa'

विनायक दत्तात्रय गोविलकर यांची कविता
प्रस्तावना

विनायक दत्तात्रय गोविलकर (तात्या) याच्या कवितांचा संग्रह काव्यरसिकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. हा संग्रह बघायला तात्या जर आज आपल्यात असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता. त्यांचे कविता लेखन तरुण वयात सुरु झाले ते अगदी शेवटपर्यंत चालूच होते. आयुष्यातले बरेवाईट अनुभव पचवून त्यांच्या कवितेने गाठलेले अनेक टप्पे त्यांची कविता कशी बहरत आणि विकसत गेली याची साक्ष देतात.

मराठीतले दोन महाकवी, तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर (कुसुमाग्रज), यांच्या कवितेचा आणि विचारांचा प्रभाव तात्यांच्या कवितेवर पडलेला स्पष्ट दिसतो. तसेच या दोन महाकवींविषयीचा आदरभाव दाखवणाऱ्या काही कविता आपल्याला या संग्रहात पहायला मिळतात. सावरकरांच्या कवितेतला स्फुल्लिंग आणि कुसुमाग्रजांचे भाषावैभव आत्मसात करणारी तात्यांची कविता पाडगावकरांनी लोकप्रिय केलेल्या वात्रटीका या काव्यप्रकारातही रमते आणि पाटणकरांच्या जीवनविषयक काही सांगू पहाणाऱ्या मराठी शायरी या प्रकारातही मनसोक्त विहार करते. मराठीतले अनेक काव्यप्रकार तात्यांनी हाताळलेले दिसतात. इतर कवींनी प्रभावीपणे हाताळलेल्या छंद, वृत्त, रचना आणि आकृतिबंध या सर्वांचा आपल्या कवितांसाठी सढळ हातांनी वापर करताना त्या सर्वांमागच्या कविकल्पनामात्र त्यांच्या स्वतःच्याच असतात. सुरवातीच्या काळात रवीकिरण मंडळाच्या शैलीशी साधर्म्य दाखवणारी त्यांची कविता आशयाच्या गरजेनुसार वेगवेगळी वळणे घेत थेट २१व्या शतकाची वेस ओलांडून नव्या युगातही सहजपणे वावरते.

हे सर्व करताना तात्यांनी स्वतःसाठी काही पथ्ये आणि बंधने पाळलेली आहेत. समाजातल्या दंभावर आणि नाकर्तेपणावर प्रहार करताना किंवा वास्तवातली कुरूपता शब्दात मांडताना त्यांची कविता कधी बिभत्स होत नाही. त्यांची वृत्त-छंदबद्ध कविता असो की क्वचित कधी अपवाद म्हणून केलेली मुक्तछंदातली कविता असो;  भाषेचे सौष्ठव वाचकासमोर लीलया मांडताना आपली कविता एखाद्या वर्तमानपत्रातल्या बातमीसारखी खळबळजनक किंवा एखाद्या स्तंभासारखी भरताड होणार नाही याची ते नेहमीच काळजी घेताना दिसतात.

कविता कशी स्फुरते याचे उत्तर कुठलाच कवी स्पष्टपणे देऊ शकत नाही. तात्या म्हणतात,

कुणास ठावे कशी उगवते कविता माझ्या मनी
मी शब्दांचे खेळ खेळतो या अक्षर अंगणी

तात्यांच्या बऱ्याच कविता घर, शेत, मळा, अंगण यावरती आहेत. वयाच्या नवव्या वर्षी वैभवशाली निसर्गाच्या सानिध्यातले कोकणातले घर सोडून मुंबईला यावे लागले तरी त्यांच्या मनात कोकणातला निसर्ग कायम घर करून राहिला होता. पुढे साठीची चाहूल लागल्यावर त्यांनी एरंजाडला शेत घेऊन आपल्या मनातले आणि स्वप्नातले घर पुन्हा बसवले. एकेक वीट रचून बांधलेल्या घरकुलाच्या अंगणात विसावताना त्यांच्या निसर्ग कवितांना पुन्हा एकदा बहर आलेला दिसतो. त्या शेतावर मोट नसली तरी जॅकवेलमधून उपसलेले पाटाचे पाणी होते. ढवळ्यापवळ्याची जोडी नसली तरी ट्रॅक्टरनी केलेली नांगरणी होती. मुलांनातवंडांबरोबर गुडघागुडघा चिखलात पाय घालून भाताची लावणी केल्याचा आनंद त्यांच्या कवितांमधे पुरेपूर उतरला होता.

कोकण आणि तिथला निसर्ग हा तात्यांच्या कवितांचा अविभाज्य भाग आहे. त्या निसर्गाचे वर्णन ते सहजपणे, ‘धुवांधार कोसळतो श्रावण तरारतो भादवा’ किंवा आश्विन कार्तिक शुभ्र शाल शरदाची अंगावरी’ असे करतात. ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गाची अनेक रूपे त्यांच्या अनेक कवितांमधे आढळतात. केवळ फुला-कळ्यांच्या वर्णनातून त्यांनी केलेले या बदलत्या निसर्गाचे चित्रण केवळ अजोड आहे.

‘हरित पालवी लेवून यावी चैती चाफेकळी’,

‘निशीगंधाने शीतल व्हावी ग्रीष्मतप्त राती’,

‘ओलेती वर्षास्नाता ही भुलवी कमलकळी’,

‘शरदकौमुदी कळ्याच जणु की पारिजात बरसात’,

‘हेमंताचे विश्व मोहरे आम्र मंजिरीतुनी’

किंवा

‘मदनबाण – विद्ध की सुंदरी शिशिरातिल मोगरी’,

अशा वैभवशाली भाषेत लिहिलेल्या ओळींमधून ते निसर्गाचे वैभव वाचकासमोर ठेवतात.

१९५२ सालानंतर तात्यांनी लिहिलेल्या कविता या संग्रहात कालक्रमानुसार ठेवलेल्या आहेत. त्याच्या आधीच्या कवितांचा संदर्भ किंवा उल्लेख कुठे सापडत नाही. जन्मभर कवितेची जपणूक करणाऱ्या कवीने आपल्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात अजिबात कविता लिहिल्या नसाव्यात हे काहीसे असंभव वाटते. मात्र पहिल्या दहा वर्षांतल्या कविता या प्रामुख्याने प्रेमकविता आणि देशभक्तीपर अशा स्वरुपाच्या आहेत. एकाच वेळी ज्या सहजपणे त्यांनी सावरकरांवर त्यांच्यासारख्याच संस्कृतप्रचुर भाषेत कविता लिहिल्या त्याच सहजपणे त्यांनी  दुसरीकडे नव्या, कोवळ्या प्रेमावर लिहिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नजाकतयुक्त भाषेतही काही कविता लिहिल्या. ‘शस्त्रकरे रुधिरे लिहिलीस गीतिका’ असे म्हणून सावरकरांचा सैनिक आणि कवी म्हणून गौरव करणारी त्यांची लेखणी,

वसंताच्या पायरवानं पृथ्वी झाली लाजवंती
चोरट्या स्पर्श कलिकांची झाली फुलं अंगावरती
उमलत्या कालिकेनं भ्रमर मुका केला !

असे काही लिहून जाते तेव्हा अशा चतुरस्त्र प्रतिभेचा हेवा वाटल्यावाचून रहात नाही.

आधी मुलांवर आणि नंतर नातवंडांवर लिहिलेल्या कविता आणि अंगाई गीते यांचे या संग्रहात एक विशेष स्थान आहे. मात्र त्यांच्या या कविता त्या मुलांवर लिहिलेल्या असल्या तरी त्या मुलांसाठी नसून त्यांच्या बालरूपाने आनंदलेल्या पित्याच्या किंवा आजोबांच्या भावनांचा आविष्कार आहे. लाडक्या नातीला नंदनपरी, रानाची मैना, चौखूर हरिणी, ठुमकती मोरणी, चाफेकळी हिरमुशी अशी विशेषणे बहाल करणारी तात्यांची कविता पहिल्या नातवाला ‘दोघे मिळुनी पाहू स्वप्न एक शुभसुंदर’ अशी साद घालते.

विविध विषयांवर कविता लिहिताना आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवून तात्यांनी काही वात्रटीकाही लिहिल्या आहेत.

कवी लिहीत होता हायकू
तिथे टपकली बायकू
तो चित्कारला, ये इधर कायकू

पाडगावकरांनी वात्रट आणि टीका असे जे वात्रटीकेचे दोन भाग सांगितलेली आहेत, त्या दोन्ही भागांचा प्रत्यय या तीन ओळींमधून आणि त्यांच्या इतरही वात्रटिकांमधून आपल्याला येतो. पण केवळ वात्रटिकांमधूनच नव्हे तर काही सामाजिक आणि राजकीय भाष्य करणाऱ्या त्यांच्या कवितांमधूनही ही विनोदबुद्धी उपहासरूपाने आपल्यासमोर येते.

खूप झाले काव्य वाटे केली परी ना शायरी
रसराज हापुस संगती असावी चावट पायरी

या चावट, आंबट पायरीतून त्यांच्या कवितांना एक वेगळीच खुमारी येते.

साठी’ नसे कौतुकाची आम्हाला
कशाला तुम्हाला हवा उत्सव?
अद्यापही फक्त मेलो न आम्ही
याचाच का व्हायचा गौरव !

या ओळींमधून त्यांच्या उपहासगर्भ विनोदाला एक वेगळी धार येते.

या वयाला शोभते का ....’ या शब्दांनी सुरु होणाऱ्या सहधर्मचारिणीच्या टीकेला आणि सल्ल्याला उत्तर देताना साठीनंतरच्या नवतारुण्यातला मिस्कीलपणा आपल्यासमोर येतो.

या वयाला सांगते मी पांडित्य ते काही करा
पंडिती ऐसी पुरे की जिंकील जी रमणीकरा

तात्यांच्या कवितांमधे सकाळ संध्याकाळच्या आकाशातले रंग आहेत. फुलाफळांचे गंध आहेत. वर्षा ऋतूच्या तुषारांचा आणि शरदाच्या चांदण्याचा गारवा आहे. तसेच निसर्गातून येणारे अनेक नाद आहेत.

‘गड गड गड सखि मेघ गर्जतिल अवकाशी अंबरी’

‘कड कड कड रोरावत येईल बिजली भूमीवरी’

‘सप सप सप बघ आल्या धारा घेऊन संगे वारा’

‘टप टप टप पानावरती ग निनादतो जलतरंग’

‘छन् छन् छन् नादतोय घुंगरू चंचल फिरतो पाय’

‘दुम दुम दुम कसा मृदंग घुमतोय नर्तक थिरकत जाय’

‘टक टक टक कशि टिपरी भिडते उडते तालावरती’

‘धुम धुम धुम धुमकतो धपकतो दणाणतो हि मृदंग’

‘खण खण खण टिपऱ्या टाळ्यांचे त्यात मिसळती रंग’

ही संपूर्ण कविता एखाद्या वाद्यवृंदासारखी आपल्या कानात घुमत रहाते.

देशभक्ती आणि महाराष्ट्रभक्तीच्या कविता आता आउट-ऑफ-फॅशन झाल्या असल्या तरी तात्यांनी त्या कविता लिहिल्या तो काळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, भारत-चीन किंवा भारत-पाकिस्तान युद्ध अशा धामधुमीचा होता. त्यातून त्यांची प्रखर राष्ट्र आणि महाराष्ट्रभक्ती तर दिसतेच, पण सावरकरांनी बघितलेल्या हिंदुकुश पर्वतापासून हिंदी महासागरापर्यंतच्या अखंड हिंदूस्तानाच्या स्वप्नावरची अढळ निष्ठाही दिसते.

तात्यांच्या वैचारिक कविता ही या संग्रहाची शान आहे. हे विचारधन म्हणजे केवळ वयाने आलेले शहाणपण नाही. त्यांनी वयाच्या ८०व्या वर्षी वृंदावनाचे नादमधुर नृत्यगीत लिहिले. मात्र वयाच्या पस्तिशीतच ‘जीवन जगून बघण्यासारखे आहे’ ही कविता लिहिली.

जीवनात ‘नाही’च्या दराने
‘आहे’ला किंमत आहे.
‘नाही’ नसावाच आणि
‘आहे’ असायलाच हवा
हे जीवनाच्या गणिताचे
प्रमेयच नाही.                              
पण
‘नाही’ आहे त्यापेक्षा
‘आहे’ जास्त आहे
म्हणूनच बाकी रहाता
उत्तर एकाच आहे की –
जीवन जगून बघण्यासारखे आहे!

८०च्या दशकानंतर शाळेत गेलेल्या मुलांना यातल्या सुरवातीच्या बऱ्याचशा कविता जुन्या वळणाच्या वाटतील. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या नातवंडांच्या पिढीला या कविता म्हणजे कदाचित आजोबांची आठवण एवढ्यापुरत्याच उरतील. पण सत्तरीच्या दशकाच्या आधीच्या पिढीला या कवितांमधून शाळेत शिकलेल्या आणि आठवणीत उरलेल्या कवितांचा पुनःप्रत्यय येईल. शार्दूलविक्रीडित वृत्तातले सुनीत असू दे की गझल या ‘वृत्ती’तली, दिवस संपला तरी रात्र भोगण्याची मस्ती शिल्लक असल्याची ग्वाही असू दे, तात्यांच्या कवितेने सुवृत्त, सुडौलपणा कायमच जपला.

मृत्यूचा अटळपणा तात्यांनी सहजपणे स्वीकारला होता.

मृत्यू तुझी इतुकीच मस्ती, प्राण माझे घेशील तू 
आत्म्यास माझ्या स्पर्शिण्याला पामरा असमर्थ तू    

असे म्हणून मृत्युला आव्हान देणाऱ्या तात्यांनी,

थंडी गुलाबी हेमंताची 
उन्हताप होतो विश्रांत 
अवचित यावा मृत्यू मजसी 
सहजची व्हावी ती संक्रांत  

असे म्हणत मृत्यचे स्वागत केले.

जवळपास ६५ वर्षांचा कालखंडात लिहिलेल्या या कविता तात्यांचे वैचारिक, मानसिक चरित्र उलगडून दाखवतात. आमच्यासाठी हा वारसा केवळ अमुल्य आहे.

- विवेक गोविलकर


No comments:

Post a Comment