https://issuu.com/lokmudra/docs/lokmudra_apr_2016/1
पुरस्कार वापसी हा मार्ग परिणामकारक आहे काय?
-
विवेक गोविलकर
vivekgovilkar@gmail.com
गेल्या काही महिन्यात आपल्या देशातले आणि
विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यातले वैचारिक वातावरण ज्या काही मुद्यांमुळे ढवळून
निघाले, त्यामध्ये पुरस्कार वापसी हा एक महत्वाचा विषय होता. या ठिकाणी हे स्पष्ट
केले पाहिजे की पुरस्कार वापसी योग्य की अयोग्य यावर बरीच चर्चा झालेली आहे. त्या
चर्चेतले मुद्दे पुन्हा इथे विचारात घेण्याचे प्रयोजन नाही. सरकारची धोरणे आणि
कृती यावर कोणत्याही मार्गाने टीका करायचा आणि त्या टीकेचा प्रतिवाद करण्याचा
किंवा अशी टीका करणाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फक्त अशी
कोणत्याही प्रकारची टीका ही अहिंसक मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि
वैयक्तिक निंदानालस्तीच्या पातळीवर न उतरता, मुद्दयांच्या आधारावर व्हावी अशी
अपेक्षा आहे.
यशस्वी व्यवस्थापनाच्या मंत्रानुसार उद्दिष्टपूर्तीसाठी
निवडलेल्या मार्गाची परिणामकारकता मोजण्यासाठी एखाद्या क्रियेची निष्पत्ती ही
महत्वाची असते. उद्देश चांगला आहे आणि त्यासाठी निवडलेला मार्ग नैतिकदृष्ट्या
योग्य आहे या गोष्टी अपेक्षित परिणाम साधण्यासाठी पुरेशा असतीलच असे नाही. याबरोबर
हेही मान्य केले पाहिजे की कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गाने आपले उद्दिष्ट साध्य
करणे हेही ‘चांगल्या’ व्यवस्थापनाच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे पुरस्कार
वापसी या हत्याराचा परिणाम मोजताना कोणत्याही प्रकारचा भावनावेग टाळून कोणत्याही राजकीय
विचारप्रणालीच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेण्याचे टाळलेले आहे. तसेच पुरस्कार
परत करणारे, त्यांना पाठींबा देणारे, त्यांना विरोध करणारे यापैकी कोणाच्याही
विचार, कृती, उद्देश यापैकी कशाही बाबत अनादर दाखवणे किंवा संशय निर्माण करणे हा
या लेखनाचा हेतू नाही.
इतर कोणत्याही कृतीप्रमाणे पुरस्कार वापसीची
परिणामकारकता मोजण्यासाठी तिची मूळ उद्दिष्टे काय
आहेत हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. ही उद्दिष्टे साध्य झाली की नाही याचा निर्णय करण्यासाठी
त्यांच्या यशापयशाच्या निःसंदिग्ध आणि समाईक
व्याख्या उपलब्ध असणे ही त्याची पुढची पायरी आहे. या व्याख्या पडताळून
पाहण्याजोग्या आणि मोजमाप करण्याजोग्या असल्याशिवाय परिणामकारतेबद्दल वस्तुनिष्ठ
निष्कर्ष काढणे कठीण असते.
पुरस्कार वापसीमागची
उद्दिष्टे काय होती किंवा काय असावीत? सर्वसाधारणपणे बहुतेक लेखकांनी याबाबत
लावलेला सूर असा होता की आपल्या देशात गेल्या एक-दीड वर्षात असहिष्णुता वाढीला
लागलेली आहे. त्यातही केंद्रातल्या एन.डी.ए.
सरकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठींब्यामुळे काही हिंदुत्ववादी शक्तींनी
विशेष आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशाच्या एकतेला आणि आतापर्यंतच्या सहिष्णु
प्रतिमेला धोका निर्माण झालेला आहे. अल्पसंख्य आणि सरकारला विरोध करणारे यांनी
भयभीत व्हावे अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. या आणि अशा काही गोष्टींचा
निषेध म्हणून लेखकांनी आपापले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आरोपांच्या गुणवत्तेच्या
वादात न शिरता त्यानिमिताने वापरलेल्या पुरस्कार वापसी या कृतीकडे त्रयस्थपणे
बघितल्यास काय दिसते? जर ‘सरकारचा निषेध’ एवढाच माफक उद्देश असेल तर तो यशस्वी
झाला असे आपण म्हणू शकतो. कारण पुरस्कार परत केले म्हणजे निषेध झाला आणि त्याला बऱ्याच
प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेकडे परत
केलेल्या पुरस्कारांमार्फत केंद्रसरकारला हा संदेश मिळाला असे आपण गृहीत धरू शकतो.
शिवाय महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनी राज्य सरकारतर्फे दिलेले पुरस्कार थेट
मंत्रालयात जाऊन परत केले. मग असा प्रश्न निर्माण होतो की निषेध नोंदवण्यासाठी पुरस्कार
वापसीची काय गरज होती? या सर्व साहित्यिकांना आपले वजन वापरून लेख, मुलाखती, चर्चा
याहीद्वारे आपला निषेध नोंदवता आला असता. यावर आपण असे म्हणू शकतो की पुरस्कार
वापसीला नेहमीच्या लेख आणि मुलाखती यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळणार आणि सरकारचा
निषेध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार हे गणित या निर्णयामागे होते. तसे ते असण्याला कोणाची
हरकत असायचे कारण नाही.
पुरस्कार वापसी
सत्रामुळे कित्येक लोकांना काही साहित्यिकांची नावे पहिल्यांदाच समजली किंवा काही साहित्यिकांना
पुरस्कार मिळाले होते हे पहिल्यांदाच समजले. अर्थात गंभीर लेखन करणाऱ्या लेखकांची
सर्वसामान्य नागरिकांना विशेष माहिती नसणे यात लेखकांसाठी काही कमीपणा नाही हे मान्य केले पाहिजे.
प्रसारमाध्यमांनी हा विषय महत्वाचा बनवला म्हणून फार मोठ्या प्रमाणात तो
सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला. पण तो विषय फक्त लोकांपर्यंत पोहोचणे एवढाच त्या
लेखकांचा मर्यादित उद्देश होता का? तसे असेल तर अल्पकालीन आणि मर्यादित फायद्यामागे
लागून त्या लेखकांनी दुर्री, तिर्री सारख्या हलक्या पानांवर हात मिळवण्यासाठी
आपल्या हातचा हुकमाचा एक्का वाया घालवला असे म्हणावे लागेल. कारण निषेध करावा असे
वाटण्याजोगी किंवा त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती भविष्यात उद्भवली तर त्यावेळी त्यांच्या
हातात पुरस्काराचे अस्त्र नसेल.
काहीतरी प्रतिकात्मक
कृती करणे आणि काहीतरी केल्याचे किरकोळ समाधान मिळवणे या पलिकडचा विचार पुरस्कार
परत करणाऱ्या साहित्यिकांनी नक्कीच केला असणार आणि काही विशिष्ट आणि निश्चित असा
उद्देश या कृतीमागे असणार. येथे प्रत्येक साहित्यिकाचा किंवा प्रत्येक गटाचा विचार
थोडाफार वेगळा असू शकतो. पुरस्कार वापसी मागची व्यापक भूमिका काय असू शकेल, याबाबत
काही शक्यता इथे दिलेल्या आहेत.
१.
एन.डी.ए. सरकार पदच्युत
करणे.
२.
स्पष्ट बहुमताच्या
जोरावर राज्य करणाऱ्या सध्याच्या सरकारला हटवणे हे पुढच्या निवडणूकीतच शक्य असल्यामुळे
सध्या त्यासाठी वातावरण निर्मितीची सुरवात करणे.
३.
बिहारच्या येऊ
घातलेल्या निवडणुकीत भाजपला सरकार बनवण्यापासून रोखणे.
४.
जनमताचा रेटा निर्माण
करून भाजप आणि मित्र पक्ष यांना कट्टरवादी भूमिका घेण्यापासून परावृत्त करणे.
५.
जनजागृती करून भविष्यात
पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे.
६.
डाव्या किंवा
हिंदुत्ववादी विचारसारणीला विरोध करणाऱ्या लोकांच्या ताब्यात असलेल्या संस्थांमधे हस्तक्षेप
करण्यापासून भाजपला परावृत्त करणे.
७.
इतिहासाचे पुनर्लेखन,
शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम यांच्या आकृतीबंधात आमुलाग्र बदल वगैरे गोष्टी
रोखणे.
ही यादी आणखीही वाढवता
येईल. पण पुरस्कार वापसीची परिणामकारता जोखण्यासाठी ती पुरेशी आहे. पुरस्कार परत
करणाऱ्या सर्व साहित्यिकांचा हा संपूर्ण अजेंडा असेल असे मानायचे कारण नाही. पण ही
यादी म्हणजे त्या सर्वांच्या मतांची गोळाबेरीज आहे असे आपण म्हणू शकतो.
निदान नजिकच्या
भविष्यात तरी एन.डी.ए. सरकार पदच्युत होऊ शकत नाही याची जाणीव सर्वांनाच आहे.
आणीबाणीच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या निवडणुकीत दुर्गा भागवत किंवा पु. ल.
देशपांडे यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात उघड भूमिका घेऊन निवडणूक प्रचारात
सक्रीय भाग घेतला होता. त्यांचा प्रयत्नाचा फायदा जनता पक्षाला झाला हे वास्तव
आहे. यावेळी अशी कुठलीही संधी नव्हती. त्यामुळे एन.डी.ए. सरकारवर या पुरस्कार
वापसीचा काहीही परिणाम झाला नाही आणि तो होणारही नव्हता. बिहारमधे नितीशकुमार-लालूप्रसाद
यादव या जोडीने भाजपचा पराभव केला हे सत्य आहे. तो का आणि कसा झाला यावर अनेकांनी
भाष्य केलेले आहे. जे.डी.यु.+आर.जे.डी.+कॉंग्रेस यांच्या मतांच्या बेरजेचे जमलेले
अंकगणित, नितीशकुमारांनी गेल्या दशकात केलेले कार्य आणि नितीश-लालू या ‘बिहारीं’विरुद्ध
मोदी-शहा हे ‘बाहरी’ हा यशस्वी प्रचार या काही गोष्टी भाजपच्या पराभवाला कारणीभूत
होत्या. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे माजी सभापती टिप ओ’नील याचे “All politics is
local.” हे प्रसिद्ध विधान शेवटच्या दोन मुद्दयांशी सुसंगत आहे. त्यामुळे
बिहारबाहेरच्या, हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांचा बिहार निवडणुकीवर
काही विशेष प्रभाव पडणे कठीणच होते. शिवाय यापैकी कोणीही साहित्यिक दुर्गा भागवत
किंवा पु. ल. देशपांडे यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रचारासाठी बिहारमधे गेले
नव्हते. त्यामुळे बिहारच्या निकालामधे इतर साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीचा वाटा
किती होता हे समजण्यासाठी एखाद्या शास्त्रीय पहाणीची गरज आहे.
वरच्या यादीतले २, ४
आणि ५ हे मुद्दे अमूर्त स्वरूपाचे आहेत. जनजागृती, वातावरण निर्मिती, जनमताचा रेटा
वगैरे गोष्टींचे मोजमाप करण्यासाठी एखादी निवडणूक, एखादा कायदा बनवणे (किंवा मागे
घेणे), चौकशी समितीची स्थापना करणे अशा कुठल्यातरी सुस्पष्ट उद्दिष्टाची गरज असते.
अर्थात केवळ गणिती मोजमाप करता येत नाही म्हणून अशा गोष्टी कोणी करू नयेत असा
त्याचा अर्थ होत नाही. फक्त त्यांच्या मोजमापासाठी काहीशी लवचिक पद्धत वापरावी लागते.
आकृती क्र. १, २ आणि ३ मधे असा प्रयत्न केलेला आहे.
आकृती क्र. १ मधे चार चौकोन आहेत. आपण कोणत्याही कृतीच्या
परिणामांचे या चार चौकोनात वर्गीकरण करू शकतो. चौकोन क्र. ४ मधे लहान जनसमुदायावर अल्प
असा परिणाम करणाऱ्या कृतींचे वर्गीकरण करता येईल. प्रत्येक गावातल्या स्थानिक मुद्दयांवर
काही सौम्य स्वरूपाची आंदोलने आणि चळवळी यांचा त्यात समावेश असेल. जर थोडासाच
परिणाम, पण तो फार मोठ्या जनसमुदायावर, म्हणजे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर होत
असेल तर त्याचा समावेश चौकोन क्र. ३ मधे करता येईल. याचे उदाहरण म्हणजे वर्तमानपत्रातल्या
बातम्यांमुळे देशभर काही दिवस मेणबत्ती मोर्चे निघतात आणि सरकारने काही कृती करावी
अशी मागणी केली जाते. काही दिवसात पहिला जोर ओसरून विशेष काही परिवर्तन न होता परिस्थिती
पूर्वपदावर येते. लहान जनसमुदायावर पण फार मोठा परिणाम घडवणाऱ्या कृती चौकोन क्र.
२ मधे येतात. आपल्या शतकानुशतके चालत आलेल्या रूढी झुगारून जात पंचायत नाकारण्याची
कृती म्हणजे या प्रकारचे उदाहरण म्हणता येईल. आणि फार मोठ्या जनसमुदायावर फार मोठा
परिणाम करणारे जयप्रकाशांचे आंदोलन हे चौकोन क्र. १ मधे समाविष्ट करणे योग्य ठरेल.
जर पुरस्कार वापसी हे
आंदोलन मानले तर त्याचे वर्गीकरण कोणत्या चौकोनात करता येईल? चौकोन क्र. १
निश्चितपणे बाद करावा लागेल. पुरस्कार वापसी बद्दलची अनुकूल चर्चा प्रामुख्याने
वर्तमान पत्रे आणि दूरचित्रवाणी या माध्यामातून झाली. सोशल मिडिया वर झालेली चर्चा
ही काही प्रमाणात अनुकूल पण मोठ्या प्रमाणात प्रतिकूल अशा प्रकारची होती. साहित्यिकांना
पाठींबा देण्यासाठी कुठे लोक रस्त्यावर उतरले नाहीत की त्यांना तसे उद्युक्त
करण्यासाठी कोणतेही समर्थ राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व पुढे आले नाही. या कारणामुळे
चौकोन क्र. ३ सुद्धा बाद करावा लागेल. चौकोन क्र. २ चा विचार केला तर काय दिसते?
प्रसार माध्यमांकडून या आंदोलनाला बऱ्यापैकी पाठींबा मिळाला तरी साहित्यिक आणि
विचारवंतांमधे या विषयावर एकमत नव्हते. बहुसंख्य साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत
केले नाहीत किंवा या विषयावर काही मतप्रदर्शनही केले नाही. काही जण पुरस्कार
वापसीच्या कारणांशी सहमत नव्हते तर काहींना कारणे मान्य असली तरी निषेधाचा हा
मार्ग मान्य नव्हता. म्हणजे साहित्यिक आणि विचारवंतांच्या आकाराने लहान
समुदायावरही या कृतीचा फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येणार नाही. म्हणजे चौकोन क्र.
४ हीच जागा पुरस्कार वापसीसाठी योग्य ठरते. वेगळ्या शब्दात म्हणजे हे आंदोलन लहान जनसमुदायावर
अल्प परिणाम करणारे झाले असे दिसून येते.
आकृती क्र. २ मधे
उद्दिष्टपूर्तीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचा परिणाम यांचा आलेख मांडायचा
प्रयत्न केलेला आहे. आडवा अक्ष प्रयत्न दर्शवतो तर उभा अक्ष परिणाम दर्शवतो.
कोणत्याही राजकीय पक्षाचे काही बांधलेले मतदार असतात. काही झाले तरी ते त्याच
पक्षाला मतदान करतात. याउलट काही मतदार कोणत्याही परिस्थितीत या पक्षाच्या विरोधात
मतदान करतात. या दोन्ही प्रकारच्या मतदारांचे वर्तन रेषा क्र. १ ने दाखवता येते, कारण
कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. रेषा क्र.
२ ही एक प्रकारची आदर्श व्यवस्था दर्शवते असे मानता येईल. त्यानुसार तुम्ही जितके जास्त
प्रयत्न कराल तेवढा तुम्ही जनमानसावर आपला जास्त प्रभाव पाडू शकाल. व्यवहारात मात्र
तसे होताना दिसत नाही. तुमचा संदेश सशक्त असेल आणि तुमचे प्रयत्न योग्य प्रकारे
आणि योग्य मार्गाने होत असेल काही काळ लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. पण एका
मर्यादेनंतर मात्र त्या प्रयत्नांचा नेमका उलटा परिणाम होताना दिसतो. जगभरात अनेक
विचारसरणींची काही काळानंतर पीछेहाट होताना दिसते ते याच कारणामुळे. रेषा क्र. ३ हा
परिणाम दाखवते. रेषा क्र. ४ प्रमाणे पहिल्यापासूनच तुम्ही जितका जास्त प्रयत्न
कराल तितका जास्त विपरीत परिणाम बघायला मिळतो. रेषा क्र. ५ ही अण्णा हजारे यांच्या
आंदोलनाचे प्रतिनिधित्व करते. काही अल्प काळासाठी फार मोठा परिणाम साधल्यानंतर तितक्याच
झपाट्याने ते आंदोलन विरूनही जाते. मात्र अण्णांच्या आंदोलनातला अत्युच्च बिंदू ‘अ’
हा अतिशय उच्च पातळीपर्यंत पोहचला होता हे लक्षात घेतले पाहिजे.
या सर्वात पुरस्कार
वापसी कुठे बसते? रेषा क्र. २ ही आदर्श म्हणून विचारात घेता येत नाही. रेषा क्र. १
हे काही जणांसाठी सर्वकालीन सत्य आहे, ते तसे राहिलच. सध्या पुरस्कार वापसी
आंदोलनात मोठ्या प्रमाणात नव्याने कोणी साहित्यिक सामील होताना दिसत नाहीत. ज्या
साहित्यिकांनी याची सुरवात केली त्यांच्याकडूनही काही नव्याने कृती होताना दिसत
नाही. त्यामुळे रेषा क्र. ३ सुद्धा खऱ्या अर्थाने लागू पडत नाही. एका अर्थाने रेषा
क्र. ५ चा आपण विचार करू शकतो. पण त्यातही जनसामान्यांवर पडणारा प्रभाव आणि जनतेचा
सहभाग या दृष्टीने पुरस्कार वापसीच्या परीणामांचा अत्युच्च बिंदू ‘अ’ हा अण्णा
हजारे यांच्या आंदोलनाच्या अत्युच्च बिंदूच्या तुलनेत बराच खालच्या पातळीवर
राहिला. रेषा क्र. ६ आणि रेषा क्र. ७ या अनुक्रमे अण्णा हजारे आणि पुरस्कार वापसी
आंदोलनाची तुलनानात्मक परिणामकारकता दर्शवतात. याउलट सोशल मिडिया वरच्या
प्रतिक्रिया विचारात घेतल्या तर रेषा क्र. ४ कडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ज्या अनेक
लोकांचे साहित्यिकांविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल असे काहीच मत नव्हते त्यापैकी काही
(अनेक?) जणांची अतिशय तीव्र आणि संतप्त अशी प्रतिक्रिया झाली. यातून पुढे जर मोठ्या
प्रमाणात धृवीकरण झाले तर निदान नजीकच्या काळात तरी त्याचा फायदा पुरस्कार वापसीमागच्या
उद्दिष्टांना होण्याची शक्यता कमी.
जयप्रकाश नारायण
यांच्या आंदोलनाच्या काळात सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणीचा विरोधी पक्षांच्या दृष्टीने
शून्य उपयोग होता. सोशल मिडीयाचा त्यावेळी जन्मही झालेला नव्हता. याउलट आता एखादे
आंदोलन प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडिया यांच्यामधून सुरु होऊ शकते. ते बऱ्याच
प्रमाणात या माध्यमांद्वारे लढवले जाऊ शकते. निदान ही माध्यमे एखाद्या जन
आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बळ देऊ शकतात. सोशल मिडिया मुळे ‘अरब स्प्रिंग’ नावाने
ओळखलेल्या परिवर्तनाला नक्की किती मदत मिळाली याबद्दल तज्ञांमधे मतभेद आहेत. पण
आता आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या अशा प्रचंड प्रमाणात सोशल मिडियाचा प्रभाव या
आंदोलनावर पडला होता हे कोणीही नाकारू शकत नाही. आपल्याकडे सुद्धा निर्भया प्रकरणामुळे
निर्माण झालेला जनक्षोभ सरकारपर्यंत पोहचवण्यात प्रसारमाध्यमांचा वाटा मोठा होता.
सध्याच्या काळात आकृती
क्र. ३ मधे दाखवलेला मार्ग क्र. १, म्हणजे प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया यांचा
वाढता सहभाग, हा आवश्यक आहे. पण फार मोठ्या परिवर्तनासाठी तो पुरेसा नाही. बिहारमधे
सुरु झालेले जयप्रकाशांचे आंदोलन मार्ग क्र. ४ वापरून देशभर पोहचले. पण आजच्या
काळात जनआंदोलन आणि प्रसार माध्यमे ही फार काळ एकमेकांपासून फटकून राहू शकत नाहीत.
त्यामुळे फार मोठ्या परिवर्तनासाठी मार्ग क्र. २ किंवा मार्ग क्र. ३ याऐवजी मार्ग
क्र. ५, म्हणजे प्रसार माध्यमे+सोशल मिडिया आणि जनता यांचा समांतर सहभाग हाच एकमेव
पर्याय राहतो. पुरस्कार वापसी करणाऱ्या साहित्यिकांनी मार्ग क्र. २, ३, ४ किंवा ५
यांचा विशेष गंभीरपणे विचार केला होता असे दिसत नाही. जर काही लोकांनी तसा विचार
केला असेल तर त्यात त्यांना काही विशेष यश मिळालेले दिसत नाही. वैयक्तिक पातळीवर
फार मोठा जनसंग्रह नसताना किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणता येईल अशा
कोणाच्या पाठींब्याशिवाय पुरस्कार वापसीचे आंदोलन आम जनतेपर्यंत पोहोचणे शक्यच
नव्हते.
शेवटी पुरस्कार वापसीमागच्या
उद्दिष्टांच्या यादीतल्या संस्था, इतिहास आणि अभ्यासक्रम यांच्या संदर्भातल्या
मुद्द्यांविषयी. या मुद्दयांवर जनमत निर्माण करणे आणि त्याद्वारे सरकारला आपल्याला
अनुकूल असे निर्णय घ्यायला भाग पाडणे हे जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी साहित्यिकांना
आपले नैतिक वजन वापरून किंवा वाटाघाटी आणि चर्चेच्या द्वारे आपले म्हणणे शासनकर्त्यांना
पटवून द्यावे लागेल. हे काम सोपे नाही. ज्यांच्या संस्थात्मक नेमणूका राजकीय
कारणांमुळे झालेल्या आहेत, त्यांच्या नेमणूका राजकीय कारणामुळे रद्दही होऊ शकतात.
आपला इतिहास इंग्रजांनी त्यांना सोयीचा असा लिहिलेला आहे, असे मानणाऱ्या लोकांची
संख्या मोठी आहे. इतिहासाच्या बाबतीत अंतिम असा शब्द असणे अशक्यच असते. नवे पुरावे,
नवे तंत्रज्ञान यांच्या वापरातून नवे निष्कर्ष निघतात आणि जुने मोडीत निघतात.
इतिहास हा इंग्रजांचा, डाव्यांचा, हिंदुत्ववाद्यांचा असा नसून तो सध्याच्या उपलब्ध
पुराव्यावर आधारित आणि व्यक्ती निरपेक्ष असायला पाहिजे. आणि तो तसा आहे याचा
लोकांना विश्वास वाटला पाहिजे. याबाबतीत प्रबोधनाचे काम फार मोठे आहे. तसे ते मोठ्या
प्रमाणात होताना दिसत नाही. त्याहीमुळे उद्दिष्ट क्र. ६ आणि ७ या बाबतीत पुरस्कार
वापसीने फार काही साध्य केले आहे असे दिसत नाही. किंबहुना तसा काही गंभीर प्रयत्न
झाल्याचेही दिसत नाही.
या सगळ्याचा विचार करता
काय लक्षात येते? पुरस्कार वापसीमुळे बहुमतातल्या सरकारला धक्का लागत नाही. निवडणुकीचा
निकाल हा अनेक मुद्द्यांचा एकत्रित परिणाम असतो. त्यातल्या एखाद्या तात्विक
मुद्द्याचा, प्रत्यक्ष प्रचारात न उतरता निवडणुकीच्या निकालांवर पडणारा प्रभाव किती
निर्णायक आहे याचे मोजमाप करणे कठीण म्हणून व्यक्तीसापेक्ष होण्याचा धोका रहातो.
केवळ प्रसारमाध्यमांवर अवलंबून राहून जनआंदोलन छेडता येत नाही. वर्तमानात केवळ
प्रतिकात्मक कृतींवर अवलंबून राहिल्यास भविष्यातल्या लढ्याची भेदकता कमी होऊ शकते.
सोशल मिडियाच्या वापरात नवी पिढी फार पुढे गेलेली आहे. नजीकच्या भविष्यात राक्षसी
ताकदीच्या प्रसारमाध्यमांना सोशल मिडिया जबरदस्त टक्कर देऊ शकते. किंबहुना त्याची
सुरवात झालेली आहे. प्रसिद्धी हे दुधारी शस्त्र आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या
प्रसिद्धीचा अगदी उलट असा परिणाम सोशल मिडीयावर होऊ शकतो. इतिहास आणि शैक्षणिक अभ्यासक्रम
या संदर्भातल्या प्रबोधनाच्या मार्गात कोणताही ‘शॉर्ट कट’ उपलब्ध नाही.
पुरस्कार वापसी करणारे,
त्यांना पाठींबा देणारे आणि भविष्यात असा काही मार्ग अवलंबू पहाणारे, असे सर्वच लोक
या मुद्दयांवर विचार करतील अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment