डॉनल्ड ट्रम्प – अमेरिकेचे भावी अध्यक्ष?
- विवेक गोविलकर
दर चार वर्षांनी
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले
उमेदवार ठरवण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्राथमिक
फेऱ्या सुमारे ९ महिने आधीच सुरु होतात. या प्राथमिक फेऱ्यांची वातावरणनिर्मिती मात्र चांगली दीड-पावणेदोन वर्षे आधी
सुरु होते. नोव्हेंबर २०१६ मधे होणाऱ्या निवडणुकीसाठी २०१५ च्या मध्यावर सुरु झालेल्या प्रचाराच्या
रणधुमाळीत जेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली,
तेव्हा सुरवातीला कोणी त्यांच्याकडे गंभीरपणे लक्ष दिले नव्हते. ‘हफिंग्टन पोस्ट’
सारख्या वृत्तसंकलक संस्थेने त्यावेळी अब्जाधीश, अनेक हॉटेल आणि कसिनोचे मालक आणि टीव्हीवरच्या
एका रिअॅलिटी शोचे संचालक असलेल्या ट्रम्प यांच्याबद्दलच्या बातम्या ‘करमणूक’ विभागात देण्याचे धोरण अवलंबले
होते.
पुढच्या सहा
महिन्यात त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांमधे अशी काही लोकप्रियता मिळवली की निवडणूक
तज्ञ, राजकीय विश्लेषक आणि निवडणूकपूर्व जनमत चाचण्या या सगळ्यांना चकवा देत
त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. परिणामतः एकेका प्रतिस्पर्ध्याने या
प्राथमिक फेऱ्यांमधून माघार घ्यायला सुरवात केली. त्यांच्या
विषारी आणि खुनशी प्रचाराची धार अशी होती की त्यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक, प्रसार माध्यमे आणि देशोदेशीचे
राजकारणाचे अभ्यासक यांना त्यांची दाखल घ्यावी लागली. हफिंग्टन पोस्टला सुद्धा ट्रम्प यांची उमेदवारी हा विनोदाचा किंवा करमणुकीचा
विषय राहिलेला नाही हे मान्य करावे लागले. अनेक राज्यातल्या प्राथमिक फेऱ्या
जिंकणाऱ्या ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे
उमेदवार म्हणून निवड होणार हे मे महिन्यात, म्हणजे प्राथमिक फेऱ्या अधिकृतपणे
संपायच्या आधीच स्पष्ट झाले. नंतर काही आठवड्यात डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी
क्लिंटन यांचीही निवड होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे अमेरिकेच्या द्वीपक्षीय
लोकशाहीत डॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातच अंतीम लढत होणार आहे. हा लेख
प्रसिद्ध होईपर्यंत दोन्ही पक्षांच्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात
आपापल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची औपचारिकता पार पडलेली असेल.
सुरवातिच्या निवडणूकपूर्व जनमत
चाचण्यांमधे हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा पिछाडीवर असलेल्या ट्रम्प यांनी जून
महिन्याच्या सुरवातीला त्यांच्याशी बरोबरी साधली. पण नंतरच्या चाचण्यांमधे क्लिंटन
यांनी पुन्हा भरघोस आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. पुढची चार महिने परिस्थिती
अशीच दोलायमान रहाणार की चित्र स्पष्ट होत जाणार हे आताच सांगणे कठीण आहे. शिवाय
जनमत चाचण्या अचूक असतील याची खातरी देता येत नाही.
ट्रम्प यांच्या या
अनेकांच्या दृष्टीने अनपेक्षित असलेल्या लोकप्रियतेचे रहस्य काय? भल्याभल्यांनी या
प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. पण यातले कुठलेही उत्तर पूर्णपणे अचूक
असेल अशी शक्यता अतिशय कमी आहे. जगविख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी अशी
प्रतिक्रिया व्यक्त केली की ट्रम्प यांची लोकप्रियता समजण्यापलीकडची आहे. त्यांच्या मते ट्रम्प
हे लोकांना काहीतरी भावनात्मक आवाहन करून त्यांची दिशाभूल करत आहेत.
प्रत्येक निवडणूकीचे
आपले असे काही वैशिष्ट्य असते. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे झालेली हिलरी क्लिंटन यांची
निवड म्हणजे पहिल्यांदाच एका प्रमुख पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारपदी झालेली एका
महिलेची निवड. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. पण ट्रम्प यांची उमेदवारी, रिपब्लिकन
पक्षाचे इतर उमेदवार आणि ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या यशाची कारणे याही गोष्टींमुळे
ही निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा वेगळी ठरते.
सर्वसाधारणपणे
निवडणूक जिंकण्यासाठी एखादा सर्वसमावेशक असा कार्यक्रम असावा लागतो. नाहीतर बहुसंख्यांना
भीती घालता येईल असा एखादा ‘शत्रू’ लोकांसमोर उभा करावा लागतो. स्थानिक विरुद्ध
परकीय असा संघर्ष पुरातन आणि जगभर चालणारा आहे. जेव्हा आर्थिक आरिष्ट आणि सर्वसामान्यांच्या
रोजगाराचा प्रश्न उग्र रूप धारण करतो तेव्हा या प्रश्नाचा राजकारण्यांनी आपल्या संकुचित
स्वार्थासाठी फायदा करून घेणे यातही काही नवीन नाही. मात्र अमेरिकेत हे इतक्या मोठ्या
प्रमाणावर आणि तेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच घडताना दिसते आहे. २००८
साली आधी अमेरिकेत आलेल्या आणि मग जगभर पसरलेल्या आर्थिक महामंदीमुळे सर्वसामान्य
अमेरिकन जनतेचे कंबरडे मोडले. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. डॉलरचे
आजचे वास्तवातले मूल्य आणि अमेरिकन कुटुंबाचे सरासरी उत्पन्न यांचा विचार करता आजच्या
पिढीची अवस्था आधीच्या पिढ्यांच्या मानाने कठीण आहे. अशा वेळी रोजगारासाठी मेक्सिकोमधून
अमेरिकेत येणारे लोक हे प्रामुख्याने गुन्हेगार, बलात्कारी आणि अमली पदार्थांचा
व्यापार करणारे आहेत आणि ते अमेरिकेच्या दुरावस्थेसाठी कारणीभूत आहेत, असा अत्यंत
तारस्वरातला प्रचार ट्रम्प यांनी सुरु केला.
हा प्रचार वास्तवाशी
फारकत घेणारा आणि अमेरिकन समाजात फूट पाडणारा असला तरी त्याचा सध्याच्या निवडणूकीत
फायदा होईल हा विचार ट्रम्प यांच्यासारख्या विधिनिषेधशून्य राजकारण्याने करावा यात
काही आश्चर्य नाही. मात्र केवळ अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहाणाऱ्याच नाही तर एकूणच
मेक्सिकन लोकांवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प यांनी, कृष्णवर्णीय, इतर अल्पसांख्य, अपंग,
महिला, न्यायाधीश, पत्रकार, आपले राजकीय विरोधक, काही देश आणि राष्ट्रप्रमुख यांच्याबद्दल
अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. आपल्या अशा वागण्याने अनेक मतदार दुरावतील याची त्यांनी
पर्वा केलेली नाही. त्यांनी इतरांबद्दल वापरलेल्या अपमानास्पद भाषेचे अनेक नमुने
लोकांना टीव्ही, वर्तमानपत्र आणि इंटरनेट या माध्यमातून रोजच्या रोज बघायला मिळत
आहेत.
ट्रम्प यांनी ‘ट्रम्प
युनिव्हर्सिटी’ सुरु केली पण ती काही काळातच बंद पडली. या प्रकरणात हजारो लोकांची फसवणूक
झाल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या एका ‘क्लास अॅक्शन’ खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती गोन्झालो कुरीएल यांच्यासमोर सुरु आहे.
ट्रम्प यांनी त्यांना या खटल्यावरून दूर करावे अशी मागणी केली. अध्यक्ष ओबामा
यांनी न्यायाधीशपदी नियुक्त केलेले कुरीएल हे ‘मेक्सिकन’ आणि ट्रम्प यांचे ‘द्वेष्टे’
आहेत असा त्यांचा आरोप होता. प्रत्यक्षात न्यायमूर्ती कुरीएल हे अमेरिकेत जन्मलेले
अमेरिकेचे नागरिक आहेत. परंतु त्यांचे आईवडील मेक्सिकन आहेत. आपण मेक्सिकोविरुद्ध
ताठर भूमिका घेतल्यामुळे त्यांचा आपल्याविरुद्ध नैसर्गिक आकस असणार, असे तर्कट ट्रम्प
यांनी लढवले. एवढ्यावर न थांबता पुढे दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी एखाद्या मुसलमान
न्यायाधीशाचाही अशाच प्रकारचा आकस असणे स्वाभाविक आहे, असे अजब तर्कशास्त्र रेटून
न्यायचा प्रयत्न केला.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या
उमेदवारीचे एक दावेदार बर्नी सँडर्स यांना विक्षिप्त आणि वेडपट
म्हणणे, पत्रकार फ्रँक ब्रुनी याचा मंदबुद्धी म्हणून उद्धार करणे, प्रसारमाध्यमांच्या
नावाने ते सगळे लोक अप्रामाणिक आहेत म्हणून खडे फोडणे, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या संपादक
मंडळाची मूर्ख म्हणून संभावना करणे, मेक्सिकोचे सरकार पूर्णपणे भ्रष्ट असून त्या
देशातून अमेरिकेत अमली पदार्थ, गुन्हेगारी आणि खुनी लोकांची आयात होते म्हणून मेक्सिको
आणि अमेरिकेच्या सरहद्दीवर एक भिंत बांधून त्यासाठी मेक्सिको सरकारला पैसे द्यायला
आपण भाग पाडू अशी फुशारकी मारणे, अमेरिकेची निवडणूक व्यवस्था गैर मार्गाने चालते
अशी टीका करणे, आपल्या रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्यांना बाहुल्या म्हणणे, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल या स्वतःच्या देशाची बरबादी करत आहेत अशी टीका
करणे, ही आणि अशी अनेक उदाहरणे ट्रम्प यांच्या प्रचाराची पातळी दर्शवतात. रिपब्लिकन
प्राथमिक फेऱ्यांमधल्या वादविवादांची पातळी एवढी घसरली होती की उमेदवारांचे
अवयव आणि एका महिला पत्रकाराविषयी सूचक पण सर्वांना समजतील असे शारीरिक उद्गार
काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अमेरिकेबाहेरच्या काही लोकांना कदाचित यात काही
विशेष वाटणार नाही. पण जगातल्या सर्वात जुन्या आणि परिपक्व लोकशाहीचा टेंभा
मिरवणाऱ्या अमेरिकन समाजासाठी हे धक्कादायक होते.
ट्रम्प यांच्या प्राथमिक
फेरीतल्या एक प्रतिस्पर्धी कार्ली फिओरिना यांचा फोटो ‘रोलिंग स्टोन’ मासिकाच्या मुखपृष्ठावर
आला होता. त्याविषयी बोलताना, “त्यांचं तोंड बघा. असल्या तोंडाला कोणीतरी मत देईल
का? अमेरीकेचे पुढचे अध्यक्ष म्हणून आपण असल्या चेहऱ्याची कल्पना तरी करू शकतो का?”
असे तारे ट्रम्प यांनी तोडले. ओबामा यांच्या विरुद्ध पराभूत झालेले रिपब्लिकन पक्षाचे
जॉन मॅक्केन हे व्हिएतनामविरुद्धच्या युद्धात जखमी
होऊन काही काळ युद्धबंदी म्हणून व्हिएतनामच्या तुरुंगात होते. अमेरिकेत त्यांना
वॉर-हीरो म्हणून मान दिला जातो. “हे कसले वॉर-हीरो?” म्हणून ट्रम्प यांनी
स्वपक्षीय नेत्याचीच खिल्ली उडवली. वर, “ते शत्रूकडून पकडले गेले म्हणून त्यांना
वॉर-हीरो म्हणतात. मला स्वतःला जे शत्रूकडून पकडले जात नाहीत असे सैनिक आवडतात.”
असे अभिरुचीहीन उद्गार काढले.
आपल्या प्रतिस्पर्धी
उमेदवाराची धोरणे आणि आश्वासने यांच्यावर टीका करणे हा निवडणूक प्रचाराचा एक सर्वमान्य
मार्ग आहे. पण हिलरी क्लिंटन यांचा उल्लेख सातत्याने ‘कुटील हिलरी’ असा करणे, हा ट्रम्प यांच्या
रणनीतीचा एक भाग आहे. क्लिंटन यांनी परराष्ट्र मंत्री असताना अधिकृत मेल सर्व्हर ऐवजी
खाजगी मेल सर्व्हर वापरल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा भंग झाला आहे काय, याबाबत
चौकशी झाली. ती चौकशी पूर्ण व्हायच्या आधीच, “क्लिंटन यांना तुरुंगातच धाडले पाहिजे.”
अशी आरोळी ट्रम्प यांनी ठोकली. ‘क्लिंटन या सर्वात जास्त भ्रष्ट राजकारणी आहेत’
अशी जाहिरात करताना ट्रम्प यांनी ज्यू लोकांच्या दृष्टीने पवित्र असलेला सहा कोनी
तारा त्यांच्या चेहऱ्यापाशी दाखवला. भ्रष्टाचारी क्लिंटन यांना धनदांडग्या ज्यू लोकांचा
पाठींबा आहे हे दाखवायचा तो एक प्रयत्न होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका
झाल्यामुळे तो सहा कोनी तारा त्या जाहिरातीतून काढून टाकावा लागला.
माजी राष्ट्राध्यक्ष
बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप
झाले. त्यांची चौकशीही झाली. दोन दशकांपूर्वीची काही प्रकरणे आता उकरून काढून त्यांचा
उपयोग हिलरी यांच्यावर चिखलफेक करण्याचे धोरण ट्रम्प यांनी अवलंबले आहे. वेळोवेळी आपल्याला
न आवडणाऱ्या महिलांबाबत ‘लट्ठ डुक्कर’, ‘विदुषकी’ अशी शेलकी विशेषणे वापरणाऱ्या ट्रम्प
यांच्या विरोधात महिलांची मते गेली तर हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध निवडणूक
लढवताना ते जड जाईल याची त्यांना कधीतरी जाणीव झाली असावी. मात्र त्यावर उतारा
म्हणून त्यांनी ‘मोनिका’ प्रकरणाचा हवाला देऊन माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी
क्लिंटन यांच्यावर जोरदार हल्ला केला. बिल हे महिलांचे शोषण करणारे सर्वाधिक
अत्याचारी अध्यक्ष होते, आणि त्यांच्या या कृत्यांची पूर्ण माहिती असलेल्या हिलरी
यांचा ती प्रकरणे लोकांसमोर येऊ न देण्यात सक्रीय सहभाग होता, असा आरोप ट्रम्प
यांनी केला. महिलांवरचे अत्याचार दडपून टाकणाऱ्या हिलरी स्त्रीवादी असूच शकत नाहीत
असा युक्तीवाद मतदारांच्या गळी उतरवण्याची ही चतुर खेळी होती.
अशा प्रकारचा प्रचार
करणारे, काहीतरी बेफाम बोलणारे ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या
उमेदवारीपर्यंत पोहचले तरी कसे? ट्रम्प यांना संधी मिळणार नाही असे मानणाऱ्या काही
पंडितांना आता असे वाटायला लागले आहे की गेल्या काही वर्षातल्या घडामोडी बघता
ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीपर्यंतची वाटचाल अपरिहार्यच होती.
प्रशासनाचा अनुभव किंवा
आंतरराष्ट्रीय राजनीतीची जाण नसलेल्या, कोणत्याही समस्येची सखोल मांडणी करण्याची क्षमता
नसलेल्या व्यक्तींना रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुकीत महत्वाचे स्थान मिळायला आठ
वर्षांपूर्वीच सुरवात झाली. ओबामांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या जॉन मॅक्केन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सुमार
कर्तृत्वाच्या आणि अत्यंत उथळ अशा सेरा पेलीन यांची निवड केली. त्यावेळी ओबामांकडे
तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होता. त्याला उत्तर म्हणून ‘मिस अलास्का’
स्पर्धेत चमकलेल्या सेरा पेलीन तरुणांना आकर्षित करतील असा आशावाद त्यामागे होता. ही
चाल तर यशस्वी ठरली नाहीच. पुढे पेलीन यांनी ‘टी पार्टी’ या रिपब्लिकन पक्षातल्या एका
जहाल सनातनी गटाच्या मनातल्या रागाला वाट करून देणाऱ्या थिल्लर चळवळीचा पुरस्कार
केला. त्यातून एकूणच अज्ञानमूलक आणि हास्यास्पद वक्तव्ये, गांभिर्याचा अभाव,
प्रश्नांची अतिसुलभ म्हणून निरर्थक मांडणी यांना प्रतिष्ठा मिळायला लागली.
गेल्या वर्षभरातल्या टीव्हीवर
दाखवलेल्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत वादचर्चा बघितल्या तर ही मुद्दा
अधिक स्पष्ट होतो. क्लिंटन आणि सँडर्स या दोन प्रमुख
डेमोक्रॅटिक नेत्यांमधील खडाजंगी बहुतांशी मुद्यांवर आधारित होती. याउलट रिपब्लिकन
पक्षाच्या नेत्यांमधील वाद हे एकतर अध्यक्ष ओबामा आणि त्यांची धोरणे यावर
विपर्यस्त टीका करणे, नाहीतर आपसात एकमेकांवर चिखलफेक अशा स्वरूपाचे होते. त्यात
ट्रम्प यांच्या विरोधातल्या जाहिरातीत त्यांच्या पत्नीच्या जुन्या, मॉडेलिंग
करतानाच्या फोटोचा वापर झाला. त्यावर ट्रम्प यांनी आपले मुख्य विरोधक टेड क्रुझ
यांच्या पत्नीविषयी काही मसालेदार माहिती प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. अशा
प्रकारे या वादांचा घसरलेला दर्जा आणि पातळी यावर रिपब्लिकन पक्षातल्या
ज्येष्ठांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली. पण त्यावर कोणाकडेच काही उपाय नव्हता.
२०१५ च्या मध्यावर अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच, एकूण १७ महत्वाचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेरीत उभे राहिले. यातले बहुसंख्य
उमेदवार कट्टर सनातनी म्हणता येतील असे आहेत. न्यूरोसर्जन बेन कार्सन, उद्योजक
कार्ली फिओरिना आणि डॉनल्ड ट्रम्प वगळता बाकी सर्व कुठल्यातरी राज्याचे आजी-माजी
सेनेटर किंवा गव्हर्नर आहेत. सुरवातीच्या या उमेदवारांच्या भाऊगर्दीत सौम्य
आणि मवाळ गटाच्या मतांचे विभाजन होऊन जेब बुश (२००० ते २००८ या काळातले अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे धाकटे बंधु) आणि मार्को रुबिओ हे उमेदवार
अपमानित होऊन बाहेर पडले. उरलेल्या उमेदवारांमधे अधिक सनातनी, तर्कदुष्ट आणि
निर्दय कोण हे दाखवायची जणू काही चढाओढ लागली.
आक्रमक शैली वापरून आणि अतिकडव्या
रिपब्लिकन मतदारांना रुचेल अशी भूमिका घेऊन ट्रम्प यांनी बाकी सगळ्या उमेदवारांना
निष्प्रभ करून टाकले. त्यांच्या भरघोस यशामुळे प्राथमिक फेऱ्या औपचारिकपणे संपायच्या
आधीच ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवड निश्चित
झाली. त्यामुळे सभापती पॉल रायन, गेल्या निवडणुकीतले पराभूत उमेदवार मिट रॉमनी अशा
रिपब्लिकन ज्येष्ठ नेत्यांची अवस्था ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी
झाली. त्यांचा ट्रम्प यांना पहिल्यापासूनच विरोध होता. पण प्राथमिक फेरीत प्रचंड
बहुमताने विजयी झालेल्या ट्रम्प यांना रोखणे कोणाच्या हातात नाही. तसा प्रयत्न
कोणी केला तर रिपब्लिकन पक्षात फूट पडणे अटळ आहे. त्याचा मोठा फायदा क्लिंटन यांना
मिळेल हे सांगायला कोण्या तज्ञाची गरज नाही.
सध्या तरी सभापती रायन
यांनी ट्रम्प यांची उमेदवारी मान्य केली आहे. अर्थात हा मारून मुटकून दिलेला
पाठींबा किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. ट्रम्प यांनी न्यायमूर्ती कुरीएल
यांच्या मूळ मेक्सिकन वंशावरून त्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल शंका व्यक्त केली
होती. असा प्रकारच्या वक्तव्यामुळे पक्षाचे आणि पक्षाच्या इतर उमेदवारांचे मोठे
नुकसान होऊ शकते. याची जाणीव झाल्याने, सभापती रायन यांना ट्रम्प यांच्या या ‘वंशद्वेषी’
विधानाबद्दल खेद व्यक्त करावा लागला. असे असले तरी ट्रम्प यांना अजुनही आपला
पाठींबा आहे, असे जाहीर करण्याइतकी केविलवाणी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली. प्रत्येकाला
आपापला मतदारसंघ संभाळायचा असतो. त्यामुळे इलनॉइ राज्याचे सेनेटर मार्क कर्क यांनी
आपण ट्रम्प याना पाठींबा देऊ शकत नाही, असे जाहीर केले. भविष्यात आणखीही काही लोक
ट्रम्प यांचा पाठींबा काढून घेऊ शकतात.
या प्रश्नाची दुसरीही बाजू
आहे. बर्नी सँडर्स यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक
फेरीतल्या पराभवामुळे कडवट बनलेले त्यांचे काही समर्थक आपण एकेवेळ ट्रम्प यांना मत
देऊ, पण क्लिंटन याना कधीच नाही, असा त्रागा करत होते. सध्या
परिस्थिती निवळल्यासारखी दिसते आहे. पण हा प्रश्न पुन्हा निघाला तर मुख्य
निवडणुकीत क्लिंटन यांना दगाफटका होऊ शकतो. शेवटी प्रत्येक पक्षाचे लोक आपापल्या
पक्षाच्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभे रहातात की नाही यावर मुख्य निवडणुकीचा
निकाल अवलंबून असणार आहे.
ट्रम्प यांच्या उमेदवारीमुळे
केवळ रिपब्लिकन पक्षातलेच नव्हे तर एकूणच अमेरिकेतले राजकीय वातावरण ढवळून निघाले
आहे. ट्रम्प यांच्या प्रत्येक सभेच्या वेळी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात
निदर्शने होतात. त्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याच्या घटना नेमाने टीव्हीवर
दाखवल्या जातात. ट्रम्प यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठ्या प्रमाणात धृवीकरण
झालेले आहे ही गोष्ट तर उघड आहे. आणि हे वातावरण नोव्हेंबर मधे होणाऱ्या
निवडणुकीपर्यंत आणखी बिघडत जाणार अशीच चिन्हे आता दिसत आहेत. मात्र खोटेपणा आणि
लबाड्या करून आपल्या विरोधकांवर कुरघोडी करण्याच्या नादात निवडणूक प्रचाराची पातळी
अधिकाधिक खाली जात आहे.
आपल्याला ट्रम्प यांच्या
विरुद्ध निदर्शने करण्यासाठी पैसे देण्यात आले होते असा आरोप करणारा कोणी एक
टीव्हीवर आला. हे पैसे नक्की क्लिंटन यांच्या समर्थकांनी दिले की सँडर्स यांच्या समर्थकांनी, यावरही वाद झाला. याउलट ट्रम्प
विरोधी निदर्शकांनी एका ट्रम्प समर्थक मुलीला रक्तबंबाळ होईपर्यंत चोपून काढले असा
आरोप झाला. पण याचा पुरावा म्हणून ट्वीटरवर प्रसिद्ध झालेला फोटो म्हणजे
प्रत्यक्षात एका भयपटातून उचललेला एका अभिनेत्रीचा फोटो आहे याचाही पुरावा पुढे
आला.
या निवडणुकीचे आणखी एक
वैशिष्ट्य म्हणजे, आपापल्या पक्षाच्या प्राथमिक निवडणुका दणदणीत मताधिक्याने
जिंकणाऱ्या ट्रम्प आणि क्लिंटन या दोन्ही उमेदवारांबद्दल सर्वसामान्य
लोकांचे मत मात्र प्रतिकूल आहे. गेल्या ३५ वर्षांत अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांविषयी
इतके प्रतिकूल मत बघायला मिळाले नव्हते. त्या अर्थाने ही निवडणूक दोन नावडत्या
उमेदवारांमधली असणार आहे. प्रमुख उमेदवारांपैकी जनमत चाचण्यांमधे सर्वात जास्त लोकप्रिय
असलेले सँडर्स यांना मात्र डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी
मिळण्याची संधी हुकली. ते स्वतंत्रपणे निवडणून लढवण्याचे टोकाचे पाउल उचलतील का, हा
प्रश्न काहींना पडला होता. पण अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर, सँडर्स यांनी ट्रम्प यांचा पराभव करण्यासाठी क्लिंटन यांना
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
केवळ मतदारांचे प्रतिकूल मत
हाच एक प्रश्न नाही. ट्रम्प यांच्या डोक्यावर ट्रम्प युनिव्हर्सिटीसंदर्भातल्या
खटल्यांची टांगती तलवार आहे. क्लिंटन यांच्यावर त्यांनी परराष्ट्रमंत्री असताना खाजगी
मेलसर्व्हर वापरला त्याबाबत राष्ट्रीय सुरक्षेचा भंग झाला नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर
कारवाई करण्यास एफ.बी.आय.ने नकार दिला, पण त्याचवेळी क्लिंटन यांचे त्यावेळचे
वर्तन अत्यंत निष्काळजी असल्याचा कडक शेराही मारला. त्यामुळे इतक्या मोठ्या
निवडणुकीत ‘निष्काळजी’ क्लिंटन आणि ‘धोकादायक’ ट्रम्प यामधून निवड करण्याचा
विचित्र प्रसंग अमेरिकन मतदारांवर ओढवणार आहे.
ट्रम्प यांची स्वार्थी
वृत्ती राष्ट्राध्यक्ष पदासाठी किती अयोग्य आहे याचे उदाहरण म्हणजे त्यांची ब्रेग्झिट
वरची वक्तव्ये. ब्रेग्झिटमुळे बाजारात ब्रिटीश पाउंडाची किंमत घसरली. त्यामुळे युनायटेड
किंग्डममधल्या सर्वसामान्य जनतेचे नुकसान झाले तरी त्याचा ट्रम्प यांच्या स्कॉटलंडमधल्या
गॉल्फ कोर्सला फायदा होईल म्हणून त्यांनी घसरणाऱ्या पाउंडाचे स्वागत केले. शिवाय “युनायटेड
किंग्डममधल्या लोकांनी युरोपिअन यूनियनमधून बाहेर पडून स्वतःचा देश परत मिळवला आहे,
अमेरिकेतही आता हेच घडणार.” अशी मल्लीनाथी केली. ब्रेग्झिट असो किंवा जगभरातली इतर
कुठलीही घटना असो, अमेरिकन मतदारांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होत नाही. पण
परदेशातून स्थलांतर करून आपल्या देशात रोजगारासाठी येणारे लोक आपल्या आर्थिक दुरावस्थेला
कारणीभूत आहेत, ही भावना जशी युनायटेड किंग्डममधे प्रबळ झाली होती, तशीच ती
अमेरिकेतही होताना दिसते आहे. ट्रम्प हे त्याचा फायदा उठवायचा निःशंकपणे प्रयत्न करत
आहेत. कुठलीही घटना ही त्यांच्या दृष्टीने त्यांच्या प्रचाराची एक संधी असते. ओरलँडो
गावातल्या गे-बार मधल्या गोळीबारात पन्नास लोक मृत्यूमुखी पडले. ट्रम्प यांच्या
मते अशा घटनांमधून त्यांची इस्लामी दहशतवादावरची मते योग्य असल्याचे सिद्ध होते.
तशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी तातडीने ट्वीटरवर दिली आणि लोक त्यांच्या दहशतवादावरच्या
भूमिकेबद्दल अभिनंदन करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शून्यातून सुरवात
करणाऱ्या ट्रम्प यांची आतापर्यंतची वाटचाल बघता, ते अध्यक्ष म्हणून निवडून आले तर
काय, या विचाराने अनेकांना धडकी भरली आहे. ट्रम्प यांना स्वतःपुढे इतर कोणताही
प्रश्न महत्वाचा वाटत नाही. त्यांच्याकडे सुसंगत असा समाज आणि देशबांधणीचा विचार
नाही. काही महत्वाच्या विषयांवर त्यांनी उलटसुलट कोलांट्या मारलेल्या आहेत.
अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांची ताकद आणि सत्तेची गुर्मी याच्या जोरावर ते
आंतरराष्ट्रीय राजकारणात हाहाःकार उडवू शकतात. मात्र अमेरिकेची न्यायालये, सेनेट, नोकरशाही,
विविध संस्था आणि त्यांच्यातली कामाची विभागणी, यामुळे त्यांना अमर्याद सत्ता उपभोगता
येणार नाही असा आशावाद काही ज्येष्ठ रिपब्लिकन नेते वर्तवत आहेत.
अमेरिका आणि
मेक्सिको दरम्यान भिंत बांधायला किंवा कोणतेही कर कमी करायला अमेरिकन काँग्रेसची
अनुमती लागेल. मात्र अध्यक्षपदावरच्या व्यक्तीकडून काँग्रेसच्या अनुमतीविना मोठ्या
प्रमाणात विध्वंसक कृत्ये होऊ शकतात. ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना
धडा शिकवण्यासाठी अब्रूनुकसानीच्या कायद्याची व्याप्ती वाढवून त्यांच्यावर कारवाई
करणे, लाखो स्थलांतरीत आणि निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परत धाडणे, मुस्लीम
लोकांना व्हिसा नाकारणे, अशा गोष्टी त्यांनी निवडणून प्रचारात अनेकवेळा बोलून
दाखवलेल्या आहेत; त्या ते करू शकतात. शिवाय वेगवेगळे वाणिज्य करार मोडीत काढणे,
WTO मधून बाहेर पडणे, NATO ही संस्था खिळखिळीत करणे, चीनी मालावर अतिरिक्त कर
लादणे, वातावरणातले बदल रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करायला नकार देणे, या आणि
अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात होऊ शकतात. घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करून
न्यायालयांना शिंगावर घेण्याची खुमखुमी त्यांच्या आहे. त्यामुळे ते निवडून येणार
नाहीत आणि आलेच तर अध्यक्षपदाच्या जबाबदारीची जाणीव ठेऊन टोकाची भूमिका घेणार
नाहीत अशी आशा करणे एवढेच त्यांच्या विरोधकांच्या हातात आहे.
No comments:
Post a Comment