saadhana, 28 Jan 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बरॅक
ओबामा यांनी आपली आठ वर्षाची अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर शिकागो येथे
केलेल्या निरोपाच्या भाषणाचा संक्षिप्त अनुवाद.
-
विवेक गोविलकर
मला स्वगृही आल्याचा आनंद वाटतो
आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या काही आठवड्यात मिळालेल्या शुभेच्छांमुळे मिशेल
आणि मी अगदी भाराऊन गेलो आहोत. पण आज मी इथे आभारप्रदर्शनासाठी उभा आहे. आपलं कधी
एकमत झालं असेल-नसेल, पण तुम्हा सर्व अमेरिकन लोकांबरोबर तुमच्या घरात, शाळांमधे,
शेतावर, कारखान्यांमधे आणि अशाच काही लांबच्या ठिकाणी झालेल्या संभाषणांमुळे मी
प्रामाणिक राहिलो आणि माझं काम चालू ठेवायला मला स्फूर्ती मिळाली. रोज मी
तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकलो. तुमच्यामुळे मी अधिक चांगला राष्ट्राध्यक्ष, अधिक
चांगला माणूस बनलो.
मी जेव्हा माझ्या विशीत
पहिल्यांदा शिकागोला आलो, तेव्हा मी कोण आहे हे समजून घेण्याचा आणि माझ्या
आयुष्याचा उद्देश शोधण्याचा माझा प्रयत्न चालला होता. इथून जवळच्या वस्तीत, बंद
पडलेल्या पोलादाच्या कारखान्यांच्या छायेत मी चर्चमधल्या काही गटांमधे काम करायला
सुरवात केली. इथल्याच गल्लीबोळांमधे मी श्रद्धेची ताकद आणि शांतपणे आपला जीवन
संघर्ष करणाऱ्या श्रमिकांची प्रतिष्ठा बघितली. जेव्हा सर्वसामान्य लोक एखाद्या
कार्यात एकत्रितपणे सामील होतात आणि काही मागणी करतात तेव्हाच काही परिवर्तन घडू
शकतं, हे मी येथेच शिकलो.
आठ वर्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून
काम केल्यावर अजूनही माझा यावर ठाम विश्वास आहे. हा फक्त माझा विश्वास नाही.
स्वयंशासनाच्या धाडशी प्रयोगाचा, आपल्या अमेरिकन संकल्पनेचा तो आत्मा आहे. आपण
सर्व जन्मतः समान आहोत, आपल्या निर्मात्याने आपल्याला कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही
असे काही हक्क दिले आहेत याबद्दलची ती खातरी आहे. या हक्कांमधे जगणं, स्वातंत्र्य
आणि आनंद मिळवणं समाविष्ट आहे.
हे हक्क उघड असले, तरी ते
आपल्या आपण बजावले जाऊ शकत नाहीत. आपण सर्वजण लोकशाहीच्या मार्गाने अधिक दोषरहित
संघराज्य बनवू शकतो. आपले श्रम, घाम आणि कल्पनाशक्ती वापरून आपल्या स्वप्नांचा
पाठपुरावा करण्याचं स्वातंत्र्य आणि एखादं मोठं उद्दिष्ट साधण्यासाठी सर्वांनी एकत्रित
प्रयत्न करण्याची आवश्यकता,
ही आपल्या राष्ट्राच्या
निर्मात्यांनी आपल्याला दिलेली भेट आहे.
गेली २४० वर्ष आपल्या
राष्ट्राने नागरिकांना दिलेल्या हाकेमुळे प्रत्येक नव्या पिढीला एक उद्दिष्ट मिळालं
आहे. यामुळेच राष्ट्रभक्तांनी हुकुमशाहीऐवजी गणराज्याची निवड केली, गुलामांनी
हिमतीने स्वातंत्र्याकडे जाणारा कामचलाऊ लोहमार्ग बांधला. याच आकर्षणामुळे
स्थलांतरित आणि निर्वासित समुद्र आणि ग्रँड नदी पार करून आले, महिलांनी मतदानाचा
अधिकार मागितला आणि कामागारांनी आपल्या संघटना बांधल्या. याचसाठी आपल्या जवानांनी
ओमाहा बीच, इराक, अफगाणिस्तान येथे आपल्या प्राणाची आहुती दिली.
आपण जेव्हा अमेरिकेला असाधारण
म्हणतो तेव्हा त्याचा हा अर्थ असतो. आपला देश सुरवातीपासून अगदी दोषरहित आहे असं
नाही. पण आपण आपल्यात सुधारणा करू शकतो आणि आपल्या बरोबर येणाऱ्यांचं आयुष्यही
अधिक चांगलं करू शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे.
मला मान्य आहे की आपली प्रगती
असमान आहे. लोकशाही आणणं कठीण असतं. ते काम सातत्यपूर्वक असावं लागतं. कधी ते
रक्तरंजित असतं. प्रत्येक दोन पावलं पुढे टाकताना अनेकवेळा आपण एक पाउल मागे टाकत
आहोत असं वाटतं. पण अमेरिकेची प्रदीर्घ वाटचाल आपल्या पुढे जाणाऱ्या गतीमुळे
स्पष्ट झालेली आहे. आपण सातत्याने आपला विचार अधिकाधिक व्यापक करून आपण त्यात
सर्वाना सामाऊन घ्यायचा प्रयत्न केला आहे.
पुढच्या दहा दिवसात आपल्या लोकशाहीचा
खास पैलू जगाला दिसेल: एका मुक्त वातावरणात निवडलेल्या अध्यक्षाकडून पुढच्या मुक्त
वातावरणात निवडलेल्या अध्यक्षाकडे शांततामय मार्गाने झालेलं सत्तांतर. ज्याप्रकारे
अध्यक्ष बुश यांनी माझ्याकडे सत्ता सोपवली त्याचप्रमाणे मी नवनिर्वाचित अध्यक्ष
ट्रंप यांच्याकडे निर्विघ्नपणे सत्ता सोपवीन असं मी त्यांना आश्वासन दिलं आहे.
आपले तरुण, आपली इच्छाशक्ती,
आपली विविधता, आपल्या समाजातला मोकळेपणा, धोका पत्करायची आणि स्वतःचा पुनर्शोध
घ्यायची आपली अमर्याद क्षमता यामुळे भविष्य आपलंच आहे. पण जर आपली लोकशाही काम करू
शकली तरच हे प्रत्यक्षात घडू शकेल. जर आपल्या लोकांची सभ्यता राजकारणातही उतरली,
जर आपण सर्वांनी आपले पक्ष आणि स्वार्थ याचा विचार न करता सध्याच्या परिस्थितीत
अत्यावश्यक बनलेल्या समाईक उद्दिष्टाची पुनर्स्थापना करायला मदत केली, तरच हे घडू
शकेल.
आज मला याच विषयावर लक्ष
केंद्रित करायचं आहे. आपल्या लोकशाहीची आजची अवस्था.
एक लक्षात घ्या, लोकशाहीमधे
सर्वांनी एकसारखं असणं आवश्यक नसतं. आपल्या संस्थापकांनी वाद घातले, तडजोडी केल्या
आणि आपणही तेच करू अशी अपेक्षा ठेवली. पण त्यांना एक माहित होतं – लोकशाहीसाठी
मूलभूत एकजूटीची गरज असते. बाह्यतः कितीही फरक असले तरी आपण सर्वजण बरोबर आहोत,
आपला उदय आणि पतन हे एकत्रितपणेच होणार आहे.
ही एकजूट मोडून पडेल असे प्रसंग
आपल्या इतिहासात अनेकदा आले. या शतकाच्या सुरवातीला अशीच परिस्थिती होती. संकुचित
होणारं जग, वाढती असमानता, लोकसंख्येचं बदलतं स्वरूप, दहशतवादाचं संकट, या सर्व
गोष्टींनी आपली सुरक्षा आणि सुबत्ता याबरोबर आपल्या लोकशाहीचीसुद्धा परिक्षा
पाहिली. आपल्या लोकशाहीसमोरच्या या आव्हानांचा मुकाबला आपण कशा प्रकारे करू, यावर
आपल्या मुलांना शिक्षण देण्याची, चांगला रोजगार निर्माण करण्याची आणि आपल्या
जन्मभूमीचं रक्षण करण्याची आपली क्षमता ठरेल.
आपल्याला चांगल्या आर्थिक संधी
आहेत असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय आपली लोकशाही प्रभावी ठरणार नाही. आज पुन्हा
एकदा आपली अर्थव्यवस्था वाढते आहे. धनिक लोक अधिक न्याय्य आणि रास्त असा करांचा
हिस्सा देत आहेत. पण आपण केलेली प्रगती पुरेशी नाही हे आपल्याला माहित आहे.
वाढत्या मध्यम वर्गाचा बळी देऊन जर काही मुठभर लोक अधिक धनवान झाले तर आपली
अर्थव्यवस्था योग्य प्रकारे काम करणार नाही आणि ती पुरेशा गतीने वाढणार नाही.
तीव्र असमानता ही लोकशाही तत्वांना मारकच असते. एकीकडे सर्वोच्च १ % लोकांनी
उत्पन्न आणि संपत्तीमधला मोठा हिस्सा बळकावला आहे तर दुसऱ्या बाजूला गरीब
वस्तीमधली आणि खेड्यांमधली अनेक कुटुंबं मागे राहिलेली दिसतात. नोकरी गमावलेले
कामगार, कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी धडपडणारे कामगार यांची अशी खातरी झाली आहे की
ही व्यवस्था त्यांच्या विरोधात आहे. त्यांना वाटतं की सरकार शक्तीशाली लोकांच्या
बाजूचं आहे. यातून आपल्या बाजूचं कोणी नाही ही भावना बळावणं आणि समाजाचं धृवीकारण
होण्याजागी परिस्थिती निर्माण होते.
यावर काही झटपट इलाज संभवत
नाही. आपला व्यापार हा केवळ मुक्त नाही तर न्याय्यही असायला पाहिजे हे मी मान्य
करतो. पण आर्थिक विस्थापनाची पुढची लाट ही परदेशातून येणारी नसेल. स्वयंचलित
यंत्रांच्या सतत वेगानं होणाऱ्या प्रसारामुळे मध्यमवर्गासाठी असणाऱ्या अनेक
नोकऱ्या जुन्यापुराण्या, म्हणून नाहीशा होतील.
आपण सर्व मुलांना शिक्षणाची
ग्वाही दिली पाहीजे. चांगला पगार मिळवण्यासाठी कामगारांना संघटना बनवण्याची शक्ती
दिली पाहिजे. ज्या कंपन्या आणि व्यक्ती यांना आर्थिक यश मिळवण्यासाठी आपल्या देशाने
मदत केली त्या देशाबद्दलचं कर्तव्य बजावताना ते करचुकवेपणा करणार नाहीत अशा
प्रकारे आपण आपल्या करप्रणालीत सुधारणा करायला पाहिजेत. जर आपण सर्व लोकांसाठी
संधी निर्माण केली नाही तर आपली प्रगती खुंटण्याला कारणीभूत झालेलं समाजातील
असमाधान आणि विभागणी या गोष्टी भविष्यात अधिक तीव्र होत जातील.
आपल्या लोकशाहीइतकाच जुना असा
आणखी एक धोका आपल्या लोकशाहीला आहे. माझ्या निवडणुकीनंतर लोक म्हणायला लागले की
अमेरिकेतला वंशवाद आता संपला. हा दृष्टीकोण अवास्तव होता. कारण आपल्या समाजाचे
तुकडे पाडणारी, वंश ही एक शक्ती अजूनही आहे. आज परिस्थिती भूतकाळाच्या तुलनेत चांगली
असली तरी आपण जिथे असायला पाहिजे तिथे अजून पोहोचलेलो नाही. आपल्याला अजून खूप काम
करायचं आहे. जर प्रत्येक आर्थिक प्रश्न हा कष्टकरी गौरवर्णीय मध्यमवर्ग आणि लायकी
नसलेले अल्पसंख्य यांच्यातील संघर्ष, अशा स्वरूपात मांडला गेला, तर भिन्न वर्णीय
कामगार उरलंसुरलं पदरात पाडून घेण्यासाठी झगडतील आणि धनिक लोक आपल्या कोषात
स्वतःला गुरफटून घेतील. केवळ आपल्यासारखे दिसत नाहीत म्हणून आपण स्थलांतरितांच्या
मुलांना शिक्षण द्यायला नकार दिला तर आपण आपल्याही मुलांचे भवितव्य संकुचित करून
टाकू.
यापुढे भेदभाव करण्याच्या
विरोधातल्या कायद्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे - नोकरीसाठी, घरं विकत घेताना,
न्यायव्यवस्था या सर्व ठिकाणी. पण फक्त कायदे पुरेसे होणार नाहीत. आपण आपले विचार
बदलायला पाहिजेत. आपण कोणीही असलो तरी आपल्या
अधिक कसून प्रयत्न करावे लागतील. सर्व नागरीक आपल्या देशावर आपल्याइतकंच प्रेम
करतात, परिश्रम आणि कुटुंब व्यवस्था महत्वाची मानतात, त्यांची मुलं आपल्या
मुलांप्रमाणेच आशा बाळगतात आणि प्रेमायोग्य असतात, या तत्वापासून आपण सुरवात
करायला पाहिजे.
हे सोपं नाही. उघड पक्षपात,
वाढते आर्थिक आणि भौगोलिक स्तर, प्रसारमाध्यमांचे प्रत्येकाच्या आवडीनुसार अनेक
वाहिन्यांमधे उडालेले तुकडे, यामुळे समाजाची विभागणी नैसर्गिक आणि काहीशी अटळ
वाटायला लागते. आपल्याला आपल्या बुडबुड्यांमधे इतके सुरक्षित वाटायला लागतं की आपण
फक्त आपल्या मताला साजेशी माहितीच स्वीकारतो.
आपल्या लोकशाहीसाठी हा आणखी एक
धोका आहे. राजकारणामधल्या वाद-संवादात विचारांची लढाई असते. आपल्या उद्दिष्टांचा
अग्रकम कदाचित वेगळा असू शकेल. ते गाठण्यासाठी आपले मार्ग वेगळे असू शकतील. पण
काही समाईक वास्तविकं आणि नवीन माहीती स्वीकारण्याची, तुमच्या विरोधकांकडे काही
चांगला मुद्दा आहे हे मान्य करण्याची, तसंच विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार या गोष्टी
महत्वाच्या असतात हे लक्षात घेण्याची तयारी नसेल, तर आपण नुसतंच बोलत राहू. मात्र
काही उभयपक्षी तडजोड अशक्य होऊन बसेल. स्वतःच्या पक्षातल्या लोकांच्या नैतिक
चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी तेच केल्यावर त्यांच्यावर
तुटून पडणं हे आपण कसं करू शकतो? हे केवळ अप्रामाणिकपणाचं नाही, तर आपल्यावरच
केव्हाही उलटू शकणारं आहे.
तर्कशुद्ध विचार आणि सर्वांच्या
हक्कांची जाणीव यामुळे महामंदीच्या काळात आपण हुकुमशाहीच्या मोहातून वाचलो आणि दुसऱ्या
महायुद्धानंतर जगातल्या इतर लोकशाही राष्ट्रांबरोबर एक आघाडी बनवली. ही आघाडी फक्त
सैन्य किंवा राष्ट्रीय संलग्नतेवर अवलंबून नव्हती. ती कायद्याचं राज्य,
मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतंत्र
वर्तमानपत्र या तत्वांवर आधारित होती.
या कल्पनेला आता इस्लामच्या
नावाखाली काही अतिरेक्यांकडून आव्हान मिळते आहे. मुक्त बाजारपेठा, खुली लोकशाही
आणि मुलकी समाज या गोष्टी आपल्या सत्तेला आव्हान देऊ शकतात असे मानणारे हिंसक,
अतिरेकी हुकुमशहा त्याला कारणीभूत आहेत. त्यांच्या मते खऱ्या-खोट्याचा निवाडा
तलवार, बाँब, बंदुका किंवा प्रचारयंत्रणा यांच्या जोरावर करणं हा सर्वश्रेष्ठ
मार्ग आहे.
आपल्या जीवनपद्धतीचं रक्षण
करण्यासाठी केवळ सैन्य पुरेसे नाही कारण भीतीमुळे लोकशाही कोसळू शकते. आपल्या
मुल्यांवर होणाऱ्या परकीय आक्रमणाविरुद्ध आपण सतर्क राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण
कैद्यांचा शारीरिक छळ करण्याची पद्धत बंद केली. मुसलमान अमेरिकन लोकांच्या
संदर्भात भेदभाव करायला मी नकार दिला. लोकशाहीचा प्रसार, मानवाधिकार, स्त्रीयांचे
हक्क, समलिंगी लोकांचे हक्क, यासाठी चाललेला आपला जागतिक लढा आपण अर्ध्यावर सोडू
शकत नाही.
आपली घटना विशेष आहे. ती
आपल्यासाठी एक सुंदर भेट आहे. पण शेवटी तो एक कागदाचा तुकडा आहे. त्याला स्वतःची
काही ताकद नाही. आपला सहभाग आणि आपली निवड यातून आपण त्याला ताकद देऊ शकतो. आपण
स्वतःला इतरांपेक्षा जास्त अमेरिकन समजायला लागलो, सगळी व्यवस्थाच भ्रष्ट आहे असे
मानायला लागलो आणि ज्या नेत्यांना आपणाच निवडून दिले त्यांनाच दोष द्यायला लागलो,
तर आपल्या सर्वांना एकत्र बांधणारे बंध कमकुवत होत जातील. शेवटी आपल्या लोकशाहीची
हीच मागणी आहे. तिला तुमची गरज आहे. फक्त निवडणूकीच्या वेळी किंवा तुम्हाला काही
गरज असते तेव्हा नाही, तर आयुष्यभर.
गेल्या आठ वर्षात मी तरुण
पदवीधर आणि नवे सैनिकी अधिकारी यांचे आशावादी चेहरे पाहिले आहेत. पक्षघात झालेल्यांना
पुन्हा स्पर्शज्ञान मिळवून देणारे आणि जखमी सैनिकांना पुन्हा आपल्या पायांनी
चालायला लावणारे वैज्ञानिक पाहिले आहेत. डॉक्टर आणि स्वयंसेवक भुकंपानंतर पुनर्निर्माण
करताना आणि साथीचे रोग थांबवताना पाहिले आहेत. काही वर्षापूर्वी सर्वसामान्य
अमेरिकन लोकांच्या परिवर्तन घडवून आणण्याच्या शक्तीवर मी विश्वास टाकला होता. मी
कल्पनासुद्धा करू शकलो नसतो अशा प्रकारे त्या विश्वासाचं मधुर फळ मला मिळालेलं
आहे.
मी अध्यक्षपदाची सूत्र हातात
घेतली त्यावेळेपेक्षा मी आज जास्त आशावादी आहे. आपण केलेल्या कामामुळे अनेक
अमेरिकन लोकांना मदत झाली आहे. अनेक अमेरिकन लोकांना, विशेषतः तरुणांना आपण काही
परिवर्तन घडवू शकतो, काहीतरी भव्य निर्माण करू शकतो असा विश्वास बाळगण्यासाठी
प्रेरणा मिळाली आहे. निःस्वार्थी, परोपकारी, नवनिर्मितीक्षम आणि देशभक्त अशी नवी
पिढी घडते आहे. मी तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात बघितले आहे. न्यायी आणि
सर्वसमावेशक अमेरिकेवर तुमचा विश्वास आहे. सततचा बदल हे अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे.
त्याची भीती न बाळगता त्याला सामोरे जायला पाहिजे. लोकशाही पुढे नेण्याचं हे कठीण
काम करायला तुम्ही तयार आहात. तुमची संख्या वाढत जाईल, त्यामुळे आपलं भवितव्य
उज्वल आहे असा मला विश्वास वाटतो.
माझ्या देशबांधवांनो, तुमची
सेवा करायची संधी मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे. मी इथेच थांबणार नाही. माझ्या
उर्वरित आयुष्यात एक नागरिक म्हणून मी सतत तुमच्याबरोबर असेन. आता यावेळी
तरुणांकडे आणि मनाने तरुण असलेल्यांकडे अध्यक्ष म्हणून माझं एक शेवटचं मागणं आहे.
मला तुम्ही आठ वर्षांपूर्वी संधी दिलीत तेव्हाही मी हेच मागणं मागितलं होतं.
परिवर्तन घडवून आणण्याच्या
माझ्या नव्हे तर तुमच्या स्वतःचा क्षमतेवर विश्वास ठेवा, एवढंच माझं मागणं आहे.
No comments:
Post a Comment